सुनील तटकरेंच्या कंपन्यांत संचालकपदी उद्धव ठाकरेंचे कुटुंबीय

मुंबई - जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कंपन्यांमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय संचालक असल्याची बाब भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी- शिवसेना यांच्या हातमिळवणीबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. तसेच राष्ट्रवादीवर निशाणा साधताना भाजपने मित्रपक्ष शिवसेनेलाही अडचणीत आणून एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जाते. मात्र या कंपन्यांमध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची नावे संचालकपदी असल्याने आता तटकरे यांच्यावर होणारे आरोप ठाकरे कुटुंबीयांनाही लागू होतात का, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतून उमटत आहे.
सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन तटकरे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या कंपन्यांची नावे आणि काही कागदपत्रे पत्रकारांना दिली. त्या कागदपत्रांमध्ये ठाकरे व त्यांच्या नातेवाइकांचा उल्लेख नव्हता. मात्र मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाइटवर सर्व कंपन्यांच्या संचालकांची व इतर माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार, कमोद ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पद्मिनिश एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व अतुल खानोलकर यांची संचालक म्हणून नावे आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 9 एप्रिल 2010 पासून रश्मी व आदित्य यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धेश रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि वेन्यू इन्फ्रा-प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये रश्मी यांचे बंधू श्रीधर पाटणकर हे 2010 पासून संचालक आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या नावाचा थेट उल्लेख न करता किरीट यांनी मोठ्या हुशारीने या चार कंपन्यांची माहिती तटकरे यांच्या इतर कंपन्यांबरोबर दिली होती, असे बोलले जाते.
एका दगडात दोन पक्षी - दोन चार्टर्ड अकाउंटंट, दोन कंपनी सेक्रेटरी यांच्या मदतीने तटकरेंच्या विरोधातील सर्व माहिती गोळा करणा-या किरीट यांच्या तीक्ष नजरेतून ठाकरे कुटुंबीयांची माहिती सुटली असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे एकीकडे भाजपचे नेते खुश आहेत. अलीकडेच शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला. त्याच वेळी विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवार मनीषा कायंदे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता होती. आता सोमय्यांनी थेट मित्रपक्षावर आरोप करण्याऐवजी त्यांनी हुशारीने या कंपन्यांची नावे पत्रकार परिषदेमध्ये दिल्याची चर्चा आहे.
कल्पना नाही : सोमय्या - याबाबत किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्याला याची काहीच कल्पना नाही. तटकरेंनी केलेल्या भ्रष्टाचारावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीने मुद्दाम बातम्या पसरवल्या जात आहेत. आजच आपण तटकरेंच्या भ्रष्टाचाराबाबत रायगड जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदवली असून मुंबईमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. या बातम्यांमुळे आपण तटकरेंच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण सोडूनही देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.






