जाहिरात
Home » Maharashtra » Mumbai » Weekly Review Of Maharashtra

मागोवा महाराष्ट्राचा : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तुझे माझे जमेना...

उन्‍मेष खंडाळे | Jan 06, 2013, 10:01AM IST
मागोवा महाराष्ट्राचा : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तुझे माझे जमेना...

ब-याच कालावधीपासून पासून मंजुरी मिळत नसलेले राज्याच्या औद्योगिक धोरणाला नव्या वर्षाचा मुहूर्त लाभला. त्यानंतर हे धोरण उद्योजकांऐवजी बिल्डरांच्या सोईचे असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर आघाडी सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादीनेही औद्योगिक धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नव्या वर्षात मुंबई लोकलच्या भाड्यात वाढ करण्यात आली. मात्र, विस्कळीत वाहतूकीने चार जणांचा बळी घेतला. बलात्कार, अत्याचार, विनयभंग आणि स्त्री भ्रुण हत्यांनी भरलेले २०१२ हे वर्ष संपून नव्या वर्षाची सुरुवातही अशाच घटनांनी झाली आहे. वाचा, गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा.


औद्योगिक धोरण जाहीर; विरोधकांसह राष्ट्रवादीची टीका

राज्य मंत्रिमंडळाने नव्या वर्षात राज्याचे नवे औद्योगिक धोरण जाहीर केले. यावर विरोधकांसह सत्ताधारी राष्ट्रवादीनेही टीका केली. रद्द करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (सेझ) जमिनींवर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची तरतूद आणि या क्षेत्रापैकी निव्वळ औद्योगिक वापराच्या जागेचे प्रमाण 50 टक्क्यांवरून 60 टक्के वाढवल्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवे औद्योगिक धोरण जाहीर करताना सांगितले. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणेही उपस्थित होते.

नवीन धोरणामुळे गुंतवणुकीतील महाराष्‍ट्राचा पहिला क्रमांक राखणे शक्य होणार असून  गुजरात राज्य पुढे असल्याचे म्हटले जात असले तरी राज्याचा जीडीपी 10 लाख कोटींपेक्षा जास्त आणि गुजरातचा पावणेपाच कोटी आहे. त्याचप्रमाणे मानवी निर्देशांकात महाराष्‍ट्र 0.68 आहे तर गुजरात 0.62 आहे. त्यामुळे  हे नवीन धोरण राज्याला नक्कीच प्रगतीकडे घेऊन जाईल, असे राणे म्हणाले.

दरम्यान, राज्याच्या औद्योगिक धोरणाच्या मंजुरीला विलंब झाल्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नामुळे संतापलेल्या उद्योगमंत्री राणे आणि पत्रकारांत चांगलीच जुंपली. या धोरणाला काही मंत्र्यांनी विरोध केल्याचे छापून आलेले वृत्त एकांगी असल्याचे सांगत राणे यांनी अज्ञानातून हे वृत्त दिल्याची टीका पत्रकारांवर केली. या वेळी उपस्थित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही वृत्तपत्रांतील नकारात्मक बातम्या मुद्दाम दिल्या असल्याचा आरोप केला.

राज्याच्या उद्योग धोरणावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेली टीका ही अज्ञानातून आणि द्वेषापोटी केली असून विरोधकांनी अभ्यास करून बोलावे, असे मत उद्योगमंत्री राणे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राज्य सरकार उद्योगांना वेगवेगळ्या सवलती देत असले तरी, काही जाचक अटी आणि तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे कंपन्या महाराष्ट्रात उद्योग काढण्याऐवजी दुस-या राज्यात जाणे पसंत करत आहेत.  रिलायन्सने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याऐवजी गुजरातमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर टाटांनीही महाराष्ट्रात पैसे गुंतवण्याऐवजी दुसरीकडे गुंतवणूक करत 80 हजार कोटी रुपये गुंतवले आहेत.

मुंबईत मध्‍य रेल्‍वेचा खोळंबा, लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणा-या लोकलने नववर्षाच्या प्रारंभीच मेगाब्लॉक आणि भाडेवाढीने त्रस्त केले. आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुळे मुंबईकरांना 'मेगाहाल' सहन करावे लागले. मुंबई उपनगरीय वाहतुकीच्या भाड्यात एक जानेवारीपासून 16 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  गेल्या दहा वर्षात प्रथमच सेंकड क्लासच्या भाड्यात ही वाढ करण्यात आली आहे.  नव्या वर्षात भाडेवाढीचा दणका देण्याबरोबरच महामेगाब्लॉकने चाकरमान्यांचे महाहाल केले. सोमवारपासून गुरुवारपर्यंत सलग चार दिवस ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना फटका बसला. शुक्रवारी संतापलेल्या प्रवाशांनी आसनगाव येथे रेल्वे स्‍टेशनमास्‍तरांना मारहाण केली होती. मेगाब्लॉकमुळे विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू झाला.  

नववर्षातही काँग्रेस - राष्ट्रवादीची शाब्दिक टोलेबाजी सुरूच

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असे नाते पाहायला मिळते. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भविष्यात यूपीएशी आघाडी करण्याबाबात फेरविचार करु, असा इशारा काँग्रेसला दिला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधेही एकमेकांना शाब्दीक टोले देण्याचे सत्रच सुरु झाले.

नववर्षानिमित्त साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही गुजरात विधानसभा निवडणूकीवरुन काँग्रेसबद्दलची नाराजी व्यक्त केली. गुजरातमध्ये राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने बंडखोर उभे केल्याचे म्हणत  काँग्रेसची भूमिका अशीच राहिली तर आम्हाला स्वबळाचा विचार करावा लागेल, असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेससोबत यायचे नसेल आणि आगामी निवडणुकीनंतर विरोधी पक्षात बसायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्‍ट्रवादीला प्रतिटोला लगावला आहे. मागील निवडणुकीतही काँग्रेसला 100 जागाही मिळणार नाहीत, असे म्हटले गेले. जास्तच जागा मिळाल्या. आगामी निवडणुकीतही असेच होईल, असा दावा त्यांनी केला.

विरोधी पक्षामध्ये बसावे लागले तरी चालेल, आमची तयारी आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाजार घेतला. काँग्रेसवर आत्मपरीक्षणाची वेळ आली असून यूपीएचे मित्रच त्यांना सोडून चालले आहेत याकडे मलिक यांनी लक्ष वेधले.

काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसने आघाडी धर्म कायम पाळला असून चुका राष्ट्रवादीकडूनच झाल्याचा आरोप पवारांच्या वक्तव्यानंतर केला होता. कॉँग्रेस व राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांकडून सध्या स्वबळावर निवडणूका लढविण्याबाबत अहमहमिका सुरु आहे.

कधी थांबणार अत्याचार ?

संपूर्ण देशाचे ह्रदय पिळवडून टाकणा-या दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अशा गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत असतानाही महिलांवरील अत्याचाराचे सत्र सुरुच आहे. बलात्कार, अत्याचार, विनयभंग आणि स्त्रीभ्रुण हत्यांनी भरलेले २०१२ हे वर्ष संपून नव्या वर्षाची सुरुवातही अशाच घटनांनी झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठड्यात राज्यात अनेक ठिकाणी महिलांच्या बलात्कारासारख्या निंदनीय घटनेबरोबरच विनयभंग आणि छेडछाडीला कंटाळून आत्महत्येसारख्या घटना घडल्या आहेत. त्यासोबतच औरंगाबादमध्ये रक्षकच भक्षक बनल्याचीही घटना समोर आली आहे.

पुण्यातील हडपसर भागात एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अभिजित शिंदे या बारावीतील तरुणास अटक केली आहे. पुण्यातील गोखलेनगर भागातील जनवाडी येथे राहणारी पीडित मुलगी हडपसर येथील हिंगणेमळा भागात आपल्या मावशीकडे गेली होती. ही मुलगी आपल्या बहिणीसोबत सकाळी बाहेर गेली असता एका तरुणाने या मुलीला झुडपात ओढून नेऊन पाशवी अत्याचार केले. मुलीसोबत असणा-या तिच्या बहिणीने आरडाओरडा केला. त्यानंतर मावशीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हडपसर परिसरातील मैदानात ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली.

अकोल्यामध्ये एका कुख्यात गुंडाच्या छळाला कंटाळून एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.  चंद्रकांत बोरकर असे त्या गुंडाचे नाव असून तो २००८ मध्ये अकोल्यात गाजलेल्या सेक्स स्कँडलमधील आरोपी आहे. गुंड बोरकर संबंधित मुलीला मागील एक वर्षापासून त्रास देत होता. संबधित तरुणीच्या घरचे लोक तिच्या लग्नासाठी वरसंशोधन करीत होती. मात्र, बोरकरने तिच्या तोंडावर रासायनिक ऍसिड टाकण्याची धमकी मुलीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

औरंगाबाद-धुळे प्रवासादरम्यान छेड काढणा-या टवाळखोराची एका तरुणीने यथेच्छ धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता तरुणीने त्याला कन्नड पोलिसांच्या स्वाधीन केले. मंगळवारी हा प्रकार घडला. मुलीने मोठ्या हिमतीने प्रसंगाला सामोरे जात छेड काढणा-याची धुलाई तर केलीच, शिवाय  चालक व वाहकास बस थेट पोलिस ठाण्यात नेण्यास भाग पाडले.

औरंगाबाद येथील महिला कॉन्स्टेबलचे तीन वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी एक वर्षापासून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यापैकी केवळ अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यावर कारवाई झाली, मात्र इतर दोन अधिकारी किशनसिंग बहुरे व नरेश मेघराजानी यांच्यावर कारवाई झालेली नाही. या प्रकरणात वरिष्ठांकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. बहुरे व मेघराजानी यांच्यावर तातडीने कारवाई करावी व माझी पुण्यात बदली करावी, अशी मागणी पीडित कॉन्स्टेबलने केली.
 

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 8

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment