भर न्यायालयात सिंधूंना दिलेली धमकी जैनांना नडली

जळगाव - घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार सुरेश जैन यांचा नियमित जामिनासाठीचा अर्ज तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. दीक्षित यांनी सोमवारी फेटाळला. घरकुलाचे तपासाधिकारी इशू सिंधू यांना भर न्यायालयात दिलेली धमकीच सुरेश जैन यांना नडली आहे.
घरकुल पाठोपाठ वाघूर योजनेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे सुरेश जैन चांगलेच संकटात सापडले आहेत. त्यातच जामीन फेटाळला गेल्याने त्यांना मोठा हादरा बसला आहे. जैन यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणासाठी पाच लाखांच्या जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन दिला होता. तात्पुरत्या जामिनाची मुदत दोन वेळा वाढवून देण्यात आली होती. तिसर्यांदा त्यांनी मुदत वाढवून मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर जैन यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. ते सध्या मुंबईत जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार संपताच त्यांना आता जिल्हा कारागृहात जावे लागेल.
जैन देणार खंडपीठात आव्हान - जैन यांनी तात्पुरत्या जामिनाच्या वेळीच नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना तात्पुरता जामीन देण्यात आल्यामुळे त्यांचा नियमित जामिनाचा अर्ज न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यावरील युक्तिवादात जैन यांचे वकील ज्येष्ठ विधितज्ञ एस. के. जैन यांनी सुरेश जैन यांना जामीन का देण्यात यावा, याची कारणे विषद केली. जैन यांची या प्रकरणात भूमिका नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जैन यांचा गुन्ह्यातील सहभाग मांडून त्यांना जामीन नाकारण्याची मागणी केली होती. त्रयस्थ अर्जदार नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे वकील अँड. पी. एन. पाटील यांनीही जैन यांना जामीन देण्यास विरोध केला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश दीक्षित यांनी जैन यांना जामीन नाकारल्यामुळे आता त्यांना औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे खटखटावे लागणार आहेत.
देवकरप्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर - घरकुल घोटाळ्यात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक करून जळगाव न्यायालयाने लागलीच जामिनावर सोडून देण्याच्या निर्णयाला आव्हान आव्हान देणारया औरंगाबाद खंडपीठातील प्रेमानंद जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायाधीश पी. व्ही. नलावडे आठ दिवसांच्या सुटीवर गेल्याने लांबणीवर पडली आहे. पोलिसांनी देवकर यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायाधीश एस.के. क्षीरसागर यांनी ती मागणी फेटाळून देवकरांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. लागलीच त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता.
रायसोनींच्या जामिनावर आज निर्णय - घरकुल घोटाळ्यातील आरोपी माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायाधीश अंबादास जोशी यांच्यासमोर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद पूर्ण केला. आता मंगळवारी निकाल दिला जाईल. रायसोनी यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा न्यायालयाने तिसर्यांदा फेटाळल्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
यामुळे फेटाळला जामीन
> गुन्ह्याचे अत्यंत गंभीर स्वरूप
> जैन यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांनी भर न्यायालयाच्या आवारात तपासाधिकारी इशू सिंधू यांना दिलेली धमकी
> राजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याने जैन या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता
> घरकुल घोटाळ्यातून कमावलेला पैसा जैन यांच्या खात्यात जमा शिवाय पोलिस तपासातून उघड झालेले खान्देश बिल्डर्सशी संबंध
> अटकेनंतर सर्मथकांमार्फत मोर्चे काढून दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न






