जळगाव: घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) असलेल्या चौघा आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज येथील उपकारागृहाचे तुरूंग अधीक्षक भाईदास ढोले यांनी आज न्यायालयाकडे सादर केला होता. त्या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने तुरुंग अधीक्षक ढोले यांना चांगलेच फटकारल्यामुळे त्यांनी अर्ज तत्काळ मागे घेतला.
जेलर डॉ.भाईदास ढोले यांनी वैद्यकीय कारणे देत आरोपी प्रदीप रायसोनी, नाना वाणी, राजा मयूर आणि पी. डी. काळे यांना नाशिक कारागृहात हलविण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एस दीक्षित यांच्याकडे केला होता. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. या चारही आरोपींना विविध शारीरिक व्याधी आहेत, असे नमूद करून ढोले यांनी अर्जात म्हटले होते की, या व्याधींत डायबेटीस, रक्तदाब, हृदयविकार याचा समावेश आहे. जळगाव कारागृहात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे या आरोपींना वारंवार जिल्हा रुग्णालयात न्यावे लागते. फक्त शुक्रवारी व मंगळवारीच वैद्यकीय अधिकारी कारागृहात तपासणीसाठी येतात. नाशिक येथील कारागृहात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक कारागृहात हलविण्याची परवानगी देण्यात यावी. या अर्जावर सुनावणी सुरू झाल्यावर असे किती आरोपी तुम्ही नाशिक येथे हलविले आहेत? अशी विचारणा न्यायालयाने ढोले यांना केली. असे आरोपी नाशिकला हलविताना तुम्ही कोणत्या न्यायालयाला विचारले होते? नुकतेच तुम्ही सानिया कादरी हीला नाशिक येथे हलविल्याचेही समोर आले आहे. त्यावेळी तुम्ही न्यायालयाची परवानगी घेतली होती का? घेतली असल्यास तसे परवानगीचे आदेश दाखवू शकाल का?असे प्रश्नही न्यायालयाने ढोले यांना विचारले. न्यायालयाच्या या प्रo्नांनी कारागृह अधीक्षक निरुत्तर झाले. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्यभार उरकण्याचे प्रयत्न करू नका, अशी तंबीही न्यायालयाने ढोले यांना दिली. आपल्या पातळीवर काय निर्णय घ्यायचा तो घ्या, असे सांगत न्या. दीक्षित यांनी आरोपींच्या स्थलांतरासाठी परवानगी मागणारा अर्ज मागे घेणार आहात की, त्यावर मी आदेश करू? अशी विचारणाही त्यांना केली. त्यावर ढोले यांनी दाखल केलेला अर्ज लागलीच मागे घेतला.
घरच्या जेवणास परवानगी
चौघा आरोपींना पोलिस कोठडी असताना न्यायालयाने घरचे जेवण व वैद्यकीय सुविधा देण्यास परवानगी दिली होती. त्याच धर्तीवर कारागृहातही या आरोपींना घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे कारागृहातही आता या चौघा आरोपींना घरचे जेवण मिळणार आहे.
वैद्यकीय कारणांसाठी केला अर्ज
घरकुल प्रकरणातील कारागृहात असलेल्या चौघा आरोपींना विविध आजार आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सेवा देणे गरजेचे आहे. जळगाव कारागृहात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. त्यामुळे या सर्वांना नाशिक कारागृहात हलविण्यात यावे, असा विनंती अर्ज मी न्यायालयाकडे केला होता. आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यास न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी मी न्यायालयाकडे तसा अर्ज केला. त्यावर न्यायालयाने ही बाब आपल्याच अखत्यारीतील असल्यामुळे आपण आपल्या वरिष्ठांशी बोलून काय ते ठरवावे, असे सांगितल्यामुळे मी केलेला अर्ज मागे घेतला. भाईदास ढोले, कारागृह अधीक्षक
गेडाम, सिंधू अवमान याचिकेवर सोमवारी सुनावणी
नगरपालिकेच्या विविध योजनांच्या चौकशीसाठी नेमलेल्या जोशी समितीच्या अहवालाबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा घरकुलच्या तपासात अवमान झाला, त्याबाबत माजी नगरसेवक विजय वाणी यांनी खंडपीठात तपासाधिकारी इशू सिंधू व तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. माजी नगरसेवक विजय वाणी यांनी औरंगाबाद खंडपीठात 15 फेब्रुवारी रोजी डॉ. गेडाम व तपासाधिकारी सिंधू यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. पालिकेच्या गैरव्यवहारासाठी नेमलेल्या जोशी समितीच्या अहवालावर अंमलबजावणी आधी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले असतानाही फिर्याद नोंदविली गेली व तपासही सुरू झाला. त्यामुळे ही अवमान याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार होती. मात्र, याप्रकरणी आता सोमवारी खंडपीठात सुनावणी होणार आहे.