भुसावळ - कर्मचारी भरतीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी रिक्रुटमेंट बोर्डाचा यशस्वी झालेला प्रयोग आता संरक्षण विभागाच्या देशातील 39 आयुध निर्माणी कारखान्यांत करण्यात येणार आहे. आयुध निर्माणीत कर्मचारी भरतीसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी ‘रिक्रुटमेंट बोर्ड’ स्थापन होणार आहे. देशात सर्वाधिक 10 आयुध निर्माणी असलेल्या महाराष्ट्रात बोर्डाचे मुख्यालय असेल. यादृष्टीने अंबाझरी (नागपूर) हे नाव निश्चित झाले आहे. 17 फेब्रुवारीला हा निर्णय घेण्यात आला.
देशातील आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये गु्रप सी, ग्रुप बी, लोअर डीव्हीजल क्लर्क आणि ट्रेड अॅप्रेंन्टाईस यांच्या नियुक्त्या स्थानिक पातळीवरील आयुध निर्माणीत करण्यात येत होत्या. यामुळे प्रश्नपत्रिकांमधील चुका, गुणांमध्ये फेरफार, पेपर फुटणे असे अनेक काही ठिकाणी उघडकीस आले होते. यासह देशातील विविध आयुध निर्माणीत वेगवेगळे नियम आहेत. रिक्रुटमेंट बोर्डाच्या स्थापनेनंतर देशातील सर्व 39 आयुध निर्माणींमध्ये भरती प्रक्रियेचे एकसारखे नियम असतील. यासंदर्भात एचएपीपी त्रिचिरापल्ली येथील जनरल मॅनेजर बी. पुगाजझेंध यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियुक्त करण्यात आलेल्या समितीने अहवाल जाहीर केला आहे. यात ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट बोर्डाच्या स्थापनेला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. ऑर्डनन्स फॅ क्टरी रिक्रुटमेंट बोर्डाचा अध्यक्ष जनरल मॅनेजर (एसएजी)च्या दर्जाचा असेल. प्रधान संचालक, रिक्रुटमेंट बोर्ड, असे या पदाचे नाव राहिल. यांच्या अधिपत्याखाली योग्य सक्षम कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येईल.
असे असतील कर्तव्य : ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून नियुक्त्यांची संख्या ठरविणे, जाहिरात प्रसिद्ध करणे, आवेदन पत्रे स्वीकारणे, कागदपत्रे स्वीकारून परीक्षेसाठी पश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे यासह आर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट बोर्डाची वेबसाइट अपडेट ठेवणे आदी कामे असतील, असे दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आंतरविभागीय स्पर्धा परीक्षांचाही अधिकार : ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून आयुध निर्माणीत गु्रप सी आणि ग्रुप बी या पदांवर प्रत्यक्ष नियुक्त्या करण्यात येतील. यासह चार्जमन आणि ज्युनिअर वर्क मॅनेजर या पदांकरीता आंतरविभागीय स्पर्धा परीक्षा देखील घेण्यात येणार आहेत. यामुळे ज्युनिअर वर्क मॅनेजर या पदासाठी फॅक्टरी अंतर्गत होणारी वशिलेबाजी देखील बंद होणार आहे.
पुणेऐवजी अंबाझरी - ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट बोर्डच्या स्थापनेबाबत नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत खडकी (पुणे) येथे रिक्रुटमेंट बोर्डाचे मुख्य कार्यालय राहणार होते. मात्र यानंतर 17 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत खडकी ऐवजी अंबाझरी (नागपूर) येथे प्रशासकीय कार्यालय ठेवण्यात आल्याचे सर्व आयुध निर्माणींना कळविण्यात आले आहे.
संघाच्या मागणीला यश - ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकर भरतीत सुसूत्रता नव्हती. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने बोर्डाच्या बैठकीत हा मुद्दा वेळोवेळी उचलून धरला होता. यामुळे आयुध निर्माणी बोर्डाने रेल्वेच्या धर्तीवर ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट बोर्डाला मान्यता दिली आहे. यातही सुसूत्रता आणून े नोकर भरती करण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. - वसंतराव नावडे, जेसीएम सदस्य, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, कोलकाता