‘एलबीटी’साठी उद्योजक आज भेटणार मुख्यमंत्र्यांना

नाशिक: महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. एलबीटी लागू करावा, या मागणीकरिता शहरातील उद्योजक आणि व्यापार्यांचे शिष्टमंडळ सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटणार आहे. दरम्यान, एलबीटी लागू करायचाच असेल तर व्यापारी महासंघाने दिलेल्या तेरा बदलांसह तो लागू करावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीने केले आहे.
अशा झाल्या घडामोडी
जकात खासगीकरण रद्दनंतर घडामोडींना वेग आला असून, विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना खासगीकरण रद्दचा ठराव विखंडित करण्यासाठी पत्र दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी जकात रद्द करून एलबीटी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीत केली. निमा, आयमा, चेंबर ऑफ कॉर्मस आणि काही व्यापारी संघटनांनी एलबीटी लागू करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. नगरविकास खात्याकडून महापालिकेला विचारणाही केली असून, सरकार सकारात्मक आहे. त्यासाठीच पुढचा भाग म्हणून पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.





