जाहिरात
 
 
 

मनसे फॅक्टरमुळे भुजबळांची वाढणार डोकेदुखी

 
Source: भूषण महाले   |   Last Updated 06:32(23/02/12)
 
 
 

नाशिक - महापालिकेत राष्ट्रवादी व कॉँग्रेसला ठेंगा दाखवत मनसेचे इंजिन सुसाट धावल्यानंतर आता पालकमंत्री छगन भुजबळ यांची डोकेदुखी  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राखताना वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार जयंत जाधव यांच्या जागेसाठी जूनमध्ये निवडणूक होत असून, त्या पाठोपाठ होणा-या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मनसेचे इंजिन थोपवण्याची कसरत भुजबळांना करावी लागणार आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसला यंदा जोरदार आघाडी घेऊन सत्ता स्थापन करण्याची संधी होती. मात्र, मनसेचे इंजिन सुसाट धावल्यामुळे राष्ट्रवादी व कॉँग्रेस बॅकफूटवर आले आहेत. राष्ट्रवादीच्या जेमतेम तीन जागा वाढल्या असून, कॉँग्रेसचे मातब्बर नगरसेवक पडल्यामुळे पानिपतच झाले आहे. पराभवामुळे दोन्ही पक्षातील कलगीतुरे वा गटबाजी उफाळून आली असताना अशा परिस्थितीत जूनमध्ये विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. राजकीय घोडेबाजार व अर्थकारणामुळे गाजणा-या या निवडणुकीत प्रामुख्याने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, कॅन्टोंमेंट बोर्डाचे सदस्य मतदार म्हणून असणार आहे. जिल्ह्याचा विचार केला, तर सर्वाधिक सदस्य आजघडीला तरी राष्ट्रवादीकडेच आहेत.

नगरपालिकेत सर्वाधिक 87, पंचायत समितीत सर्वाधिक 57, जिल्हा परिषदेत सर्वाधिक 27 असे राष्ट्रवादीचे सदस्य असून, या तिन्ही ठिकाणी दुस-या क्रमांकावर कॉँग्रेसचे सदस्य आहेत. केवळ नाशिक महापालिकेत कॉँग्रेस आघाडी पिछाडीवर आहे. त्यामुळे कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेत फारशी अडचण दिसत नसली तरी, युती व मनसे अशा दोन्हींच्या स्वतंत्र उमेदवारांमुळे स्वत:चे हक्काचे मतदान सांभाळून ठेवण्याची कसरत राष्ट्रवादीला करावी लागणार असल्याचे दिसत आहे. मनसेबाबत बोलायचे तर मनपातील 40 सदस्य वगळता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत मनसेचे जेमतेम 15 सदस्य आहेत.  दुसरी बाब म्हणजे, मालेगाव महापालिकेची निवडणूक एप्रिलच्या आसपास होणार असल्यामुळे येथील संख्याबळही निर्णायक भूमिका बजावेल.

लोकसभेसाठीही भुजबळांची ‘परीक्षा’ - महापालिका निवडणुकीत मनसेने बाजी मारली असली तरी, या यशाचे पडघम तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतच दिसले होते. लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या मनसेने दुस-या क्रमांकाची मते मिळवत छगन भुजबळ यांचे पुतणे खासदार समीर भुजबळ यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यामुळे यंंदाही लोकसभा निवडणुकीत मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार असून, विधानसभेतील तिन्ही मतदारसंघांवरील पकड तसेच महापालिकेतील वाढते संख्याबळ बघता लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघाची जागा भुजबळांसाठी परीक्षाच ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे. त्यातच समीर भुजबळांविरोधात राज ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी, असे आव्हान छगन भुजबळ यांनी दिल्यामुळे मनसेकडूनही प्रतिष्ठेचा मुद्दा केला जाण्याची शक्यता आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
1 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment