धुळे: मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना सद्भाव कंपनीने सोनगीर येथे टोलनाका थाटून वसुली सुरू केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आंदोलन केले. आंदोलकांनी टोलनाका ताब्यात घेत महामार्गावरून ये-जा करणार्या वाहनांना टोल न भरता सोडून दिले. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू होते. या वेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
धुळे ते पळासनेर दरम्यानच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम केवळ 50 टक्के झाले असताना सदर काम करणार्या खासगी कंपनीद्वारे सोनगीरनजीक टोल नाका उभारून वाहनचालकांकडून टोल वसुली सुरू केली आहे. या टोल वसुली विरोधात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनसेने सोनगीर टोल नाक्यावर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी टोल वसुली बंद पाडली. टोलनाक्यावरील कर्मचार्यांना पिटाळून थेट बूथ मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी रास्ता रोको करताना अडवलेली सर्व वाहने टोल वसुली न करताच सोडून दिली. हा प्रकार सुमारे तासभर सुरू होता. त्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मनसेच्या पदाधिकार्यांनी टोलनाक्याचे व्यवस्थापक र्शी. दळवी आणि जनार्दन यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच 1 मार्चपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यासंदर्भात मनसेचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव जिरेकर, जिल्हा संघटक किरण बागुल, अजित राजपूत, शिंदखेडा तालुकाध्यक्ष दीपक चौधरी, दरबारसिंग बागुल, अनिल सिसोदे, विनोद चौधरी, संदीप कदम, चेतन परमार, कुंदन पवार, कल्पेश पाटील यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार हे करीत आहेत. या आंदोलनाने सुमारे दीड तास महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या वेळी सोनगीर पोलिस ठाण्याचे कर्मचारी हजर होते.
दखल न घेतल्याने आंदोलन
मनसेने जिल्हा प्रशासनाला या टोल वसुलीसंदर्भात मागील महिन्यात 17 जानेवारीला विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्यामुळे मंगळवारी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी धुळे, शिरपूर, नरडाणा आणि शिंदखेडा तालुक्यातील मनसेचे सुमारे तीनशे कार्यकर्त्यांचा जमाव या वेळी उपस्थित होता. आंदोलनामुळे सुमारे तास -दीडतास वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. निवेदन दिल्यानंतर जामव शांत झाला. या वेळी जमावाने जोरदार घोषणाबाजीदेखील केली.काहींनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.या वेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली.
आंदोलकांनी सोडली वाहने
आंदोलकांनी टोल नाक्यावरील टोल वसुली करणारे चारही बूथ ताब्यात घेत निदर्शने करून घोषणाबाजी केली. या नंतर रास्ता रोको करून महामार्गाच्या दुतर्फा थांबलेल्या वाहनांना टोलच्या पावत्या न फाडता सोडून देण्यात आले. सुमारे तासभर अशा प्रकारे वाहनधारकांना टोल न भरता सोडून दिले.
अन्यथा पुन्हा आंदोलन
मनसेने जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु काहीही कारवाई न झाल्याने मंगळवारी टोल नाके ताब्यात घेऊन वाहनधारकांची होणारी लूट थांबवण्याचे आंदोलन करण्यात आले. 1 मार्चपर्यंत याबाबत निर्णय घेतला गेला नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल. याबाबत आम्ही वेळोवेळी निवेदने, सूचना दिलेल्या आहेत. बबनराव जिरेकर, जिल्हाध्यक्ष
मागण्या कायम..
या वेळी मनसेच्या आंदोलकांनी सद्भाव कंपनीच्या टोलनाका व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात धुळे-पळासनेर चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावरच टोल वसुली सुरू करावी. या वसुलीतून शिंदखेडा तालुक्यातील वाहनधारकांना कायमस्वरूपी वगळण्यात यावे, आवश्यक तेथे गतिरोधक टाकावेत, टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी आदी या मागण्या करण्यात आल्या आहेत.