नाशिक: महापालिकेत 13 वर्षे सत्ता भोगणार्या शिवसेनेच्या उमेदवारांना आलेल्या अपयशानंतर मंगळवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात छोटेखानी मेळावा घेऊन पदाधिकार्यांनी सांत्वन करत एकमेकांना आधार देऊ केला.
पक्षाला निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर दगाफटका सहन करावा लागला. अनेक उमेदवारांच्या पाठीत तर आपले म्हणणार्यांनीच खंजीर खुपसला. अर्थात, अंतर्गत गटबाजी हेच त्याचे प्रमुख कारण असले तरी आता झाला गेला प्रकार विसरून आपापसातील हेवेदावे मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या 26 आणि भाजपच्या 14 अशी 40 सदस्यसंख्या झालेल्या युतीने मुश्किलीने सत्ता मिळवली होती. त्यावेळी मनसेने तटस्थ राहत शिवसेनेच्या सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला होता. विनायक पांडे यांनी अपक्षांसह छोट्या पक्षांच्या सदस्यांची मोट बांधत पालिकेवर भगवा फडकवला होता. या वेळी मात्र शिवसेनेला 20 चा आकडाही पार करता आलेला नाही. बालेकिल्ला म्हटला जाणार्या नाशिकमध्ये सेनेला हा मोठा धक्का सहन करावा लागला आहे.
सत्तेचे समीकरण या वेळी जुळून येण्याची शक्यता जवळपास नसल्याने आता सेना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले असतानाच ‘पदरी अपयश का आले’ याची कारणे जाणून घेण्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांनी एकत्र येत मध्यवर्ती कार्यालयात सभा घेतली. पराभव झालेल्या सदस्यांना या वेळी आमंत्रित करण्यात आले होते. अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजी विसरून नव्याने पक्षाची बांधणी करण्याचे या छोटेखानी मेळाव्यात ठरले. पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वकीयांकडूनच दगाफटका झाल्याने त्याची कारणमीमांसाही या वेळी करण्यात आली. मोठे अपयश आल्याने आता एकमेकांचे उणेदुणे काढत बसण्यापेक्षा बालेकिल्ला पुरता ढासळू न देण्यासाठी आगामी काळात काय करता येईल, याचे आत्मचिंतनही या मेळाव्यात करण्यात आले.
सभेला जिल्हाप्रमुख सुनील बागुल, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अर्जुन टिळे आदी पदाधिकार्यांसह निवडणुकीतील उमेदवार उपस्थित होते.