नाशिक - मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांची मालमत्ता व भ्रष्टाचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करून त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कृपाशंकर सिंग यांच्या चौकशीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्वतंत्र समिती नियुक्त केली जाणार असून संपूर्ण माहिती हाती आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच कृपाशंकरसिंग यांनी हायकमांडकडे राजीनामा दिला असून त्यावर निर्णय प्रलंबित आहे. पक्षश्रेष्ठीही आवश्यक वाटल्यास कारवाई करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
जनतेचा कौल मान्य - नाशिक महापालिकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सत्तास्थापनेबाबत आग्रही असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र जनतेचा कौल आपल्याला मान्य असल्याचे सांगत विरोधी बाकांवर बसण्याचे संकेत दिले. अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जनतेने कॉँग्रेस आघाडीला नाकारले असून त्यांचा निर्णय मान्य आहे. तरीदेखील इतर पक्षांच्या सत्ता समीकरणावर लक्ष ठेवून आहोत. अपयशाची कारणमीमांसा घेऊन त्याचे विश्लेषण केले जात आहे.