जाहिरात
 
 
 

सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त होतेय ‘दम मारो दम’

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 07:36(22/02/12)
 
 
 

धुळे: केंद्रशासनाने धूम्रपानाबाबत नवीन नियमावली तयार करून 2 ऑक्टोबर 2008पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई केली आहे. या नव्या नियमानंतरही सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे ‘दम मारो दम’ सुरू असते. इतकेच नव्हे तर चालत्या बसमध्ये, अगदी वर्दळीच्या ठिकाणीही ही फुकेगिरी सुरू असल्याचे चित्र दिसते. याबाबत ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत सार्वजनिक, वर्दळीच्या ठिकाणीच टपर्‍यांची संख्या जास्त असून तेथे सर्रास धूम्रपान होत असल्याचे दिसते.

धूम्रपानाची वाढती समस्या लक्षात घेऊन 2008मध्ये केंद्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई करणारा आदेश निर्गमित केला. त्यानुसार सार्वजनिक तसेच खासगी कामाच्या जागा, हॉटेल, हॉल, डिस्कोथेक, कॅन्टीन, कॉफी हाउस, पब, बार, विमानतळ, रस्ता वा अन्य सार्वजनिक जागांवर ही मनाई लागू करण्यात आली आहे. नागरिक अन्य ठिकाणी धूम्रपान करू शकतात; परंतु सध्या मनाई केलेल्या ठिकाणीच मोठय़ा प्रमाणावर धूम्रपान होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. धुळय़ात बसस्थानक, कॅन्टीन, चहाच्या टपर्‍या, वर्दळीचे ठिकाण, बाजाराचे ठिकाण आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर धूम्रपान होत असल्याचे चित्र दिसून येते. याचा लहान मुले, महिलांना जास्त त्रास होत असतो. याशिवाय हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये तर धुरळाच धुरळा दिसतो. ऑटोरिक्षा, चालत्या गाड्या, बसमध्येही हे फुकेबाज थांबताना दिसत नाही. याबाबत अनेकदा वादही होताना दिसतात.

कॅन्टीन बनले धूरगृहे

शहरातील जवळपास सर्वच कॅन्टीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर चहा आणि सिगारेट हे समीकरण साधत धूम्रपान केले जाते. याशिवाय लहानमोठय़ा चहाच्या गाड्या, टपर्‍यांवरही सिगारेट पिणारेच जास्त असतात. विशेषत: तरुणांमध्ये ही फॅशन रुजू पाहत आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसच्या आजूबाजूला असलेल्या गल्लीबोळातील कॅन्टीनमध्ये धूर काढणारे तरुण नजरेस पडतात.

जागोजागी उगवल्या टपर्‍या

धुळे शहरात जागोजागी मोठय़ा प्रमाणावर टपर्‍या उगवल्या आहेत. या टपर्‍यांमधून मोठय़ा प्रमाणावर सिगारेट, पान, विडी, तंबाखूची विक्री केली जात असते. अगदी सहजतेने सिगारेट मिळत असल्याने सिगारेट पिणार्‍यांची संख्या जास्त आहे. युवकांची वर्दळ असणार्‍या ठिकाणी या टपर्‍या मोठय़ा प्रमाणावर आहेत. लहानमोठय़ा टपर्‍या, हातगाड्या अथवा हातावर तंबाखूजन्य वस्तू घेऊन फिरणार्‍यांची संख्याही कमी नाही.

दंडाचा अभाव

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिणार्‍यांना दंड होणे आवश्यक आहे. याकामी पोलिसांनी पुढाकार घेऊन दंडाची कारवाई केल्यास धूम्रपान करण्याला आळा बसेल. बसस्थानक, रेल्वेस्थानक व गर्दीच्या ठिकाणी धूम्रपान करणारे दिसल्यास त्यांना त्वरित दंड झाला तरच अन्य लोकांवर वचक बसेल.

जनजागृती आवश्यक

सार्वजनिक ठिकाणी ‘सिगारेट पिण्यास बंदी आहे’ अशा आशयाच्या पाट्या लावणे आवश्यक असताना, अशा प्रकारच्या पाट्या बर्‍याच ठिकाणी लावलेल्या नाहीत. याशिवाय याबाबत जनजागृती आवश्यक असताना ती केली जात नाही. तसेच बर्‍याच ठिकाणी पाट्या लावण्यात आलेल्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बर्‍याच हॉटेल किंवा बारमध्ये अशा पाट्या असतातही ; परंतु तरीदेखील त्या ठिकाणी बिनधास्तपणे धूम्रपानाला परवानगी दिली जाते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 1

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment