Home » Maharashtra » North Maharashtra » Nashik » State Deputy Minister Ajit Pawar Comment On Shiv Sena At Nashik

शिवराळ भाषेने प्रश्न सुटत नाहीत; अजित पवारांची शिवसेनेवर घणाघाती टीका

प्रतिनिधी | Feb 15, 2013, 11:24AM IST
शिवराळ भाषेने प्रश्न सुटत नाहीत; अजित पवारांची शिवसेनेवर घणाघाती टीका

नाशिक- ‘‘शिवराळ भाषा वापरून लोकांचे प्रश्न सुटत नसतात. राजकीय पोळी भाजण्यासाठी युवकांना भडकावण्याचे काम शिवसेनेने केले, ते राष्ट्रवादीत होत नाही. ‘जय भवानी, जय शिवाजी आणि टाक खंडणी’ असे इथे चालत नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या कारभाराचे मूलभूत तत्त्व सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पक्षात स्वागत केले. गर्दीने ओसंडून वाहणार्‍या या सोहळ्याला हजारो बागुलसर्मथक उपस्थित होते.

बागुल यांच्यासह अर्जुन टिळे, शोभा मगर व अन्य सहकार्‍यांच्या पक्षप्रवेशानिमित्त आयोजित मेळाव्यात पवार म्हणाले, ‘‘आम्ही बेरजेचे राजकारण करणारे असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करायला आम्हाला पवारसाहेबांनी शिकवले आहे. राज्यात दुष्काळ आणि तुमच्या नाशिकमध्ये गारपिटीने वेगळी समस्या निर्माण केली आहे. अशा वेळी काही लोक दुष्काळाचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करतात.’’

या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, अर्जुन टिळे व शोभा मगर यांचीही भाषणे झाली. आमदार हेमंत टकले, ए. टी. पवार, पंकज भुजबळ व जयंत जाधव, तसेच खासदार समीर भुजबळ, माधवराव पाटील, दिलीप बनकर, रवींद्र पगार, र्शीराम शेटे, संजय बागुल, जयर्शी पवार, देवीदास पिंगळे, भिकूबाई बागुल, गजानन शेलार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले,
विदुषकी चाळ्यांनी करमणूकच.
काहींनी तर ऑर्केस्ट्राच काढलाय. नक्कल करून प्रश्न सुटत असतील तर कोणीही ते करेल; पण असे विदुषकी चाळे करून केवळ करमणूकच होईल. समस्या मात्र तशाच राहतील.

मराठ्यांची औलाद आहोत...
राज्य सेवेच्या परीक्षेसाठी आम्ही म्हणे उर्दू आणि हिंदी भाषेतून उत्तरे लिहायला परवानगी दिली. जाहीर सभेत काहीही बोलायचे. त्याबाबत म्हणे जीआरही काढला. खोटे बोलायचे पण रेटून. अरे आम्ही पण मराठय़ाची औलाद आहोत. अशी परवानगी देऊच कशी? परीक्षा मराठीतच होणार आहे.


पाहुण्यासारखे वागू नका
सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायला वाव आहे, हा विचार करूनच बागुल यांनी राष्ट्रवादीची निवड केली. बागुलांनी शिवसेनेत असतानाही माझ्याबरोबर काम केले आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही आणि माझ्याबरोबर पाहुण्यासारखं वागायचं नाही. त्यांना कधीही अंतर देणार नाही. शिवसेनेला आपण फोडत नसलो तरी तो पक्षच फुटत आहे. त्यांनीच दुकान बंद करायचं ठरवले असेल तर त्याला आपण काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मिळताजुळताच पक्ष
सुनील बागुल यांनी राष्ट्रवादी हा शिवसेनेशी मिळताजुळता पक्ष असल्याने तसेच राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची कामाची पद्धत जवळून पाहिल्यानेच या पक्षात आल्याचे सांगितले. शिवसेनेने ज्या प्रकारे काढून टाकले, त्यामुळे दुखावलो असून, 2014 च्या निवडणुकीत काम काय असते आणि ताकद काय असते ते दाखवून देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Email Print
0
Comment