पुणे - एसटीचा माथेफिरू चालक संतोष मानेने बेदरकारपणे बस चालवून नऊ निष्पापांचे बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री पुण्यात एका मद्यधुंद कारचालकाने नो एंट्रीतून बेफाम वाहन चालवून 18 वाहने चिरडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. दुस-या घटनेत पिंपरीत एका स्कॉर्पिओचालकानेही पोलिसांचा पाठलाग टाळण्यासाठी पाच- सहा दुचाकींना धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ भालचंद्र तळेकर (वय 21, रा. संतोष श्रद्धानगर, रहिवासी संघ, एम-2, गोरेगाव - पूर्व, मुंबई) हा मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत आपली इंडिगो कार (एमएच 06 ए जे 8509) बेफामपणे चालवत महात्मा गांधी रस्त्यावरून कोंढव्याच्या दिशेने चालला होता. मात्र नशेत असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व रस्त्यात येईल त्या गाड्या, माणसांना धडक देत त्याने बेफामपणे कार चालवली. या घटनेत सर्व गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. मात्र पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले. या घटनेत शंकर पाटील यांच्या इंडिका कारचे, नीरज सिंग यांच्या फियाटचे, समीर लखानी यांच्या गाडीचे अधिक नुकसान झाले.
हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. मात्र धाडस करून काही तरुणांनी झडप घालून चालकाला पकडले व गाडीवर नियंत्रण मिळवले. चिडलेल्या नागरिकांनी चालकाला बेदम मारहाणही केली. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो चालवत असलेली गाडी त्याचीच असल्याची माहिती लष्कर पोलिसांनी दिली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन नंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
पिंपरीतही थरारक पाठलाग - हमीद निथुभाई शेख (वय 50) हे गृहस्थ मंगळवारी रात्री खडकीहून पिंपरीच्या दिशेने स्कार्पिओ गाडीतून चालले होते. खडकी येथे पोलिसांनी नाकेबंदी करण्यासाठी रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारले होते. मात्र तेथे न थांबता शेख यांनी बॅरिकेड्स तोडून गाडी पुढे नेली. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. ते पाहून शेख यांनी अधिक वेग घेत गाडी पुढे नेली. मुंबई-पुणे महामार्गावर गाडी घेऊन ते दापोडीच्या दिशेने निघाले. वाटेत दापोडी, बोपोडी येथील सर्व सिग्नल तोडत पुढे चालले होते. पोलिसांनी वायरलेस यंत्रणेवर नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळवल्यावर नाशिक फाटा येथे शेख यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शेख यांनी त्यांनाही न जुमानता वेग वाढवत पिंपरीची दिशा धरली. वाटेत नेहरूनगर येथे पाच-सहा दुचाकी वाहनांना त्यांनी उडवले. त्याच वेळी एक टेंपो वाटेत आडवा आल्याने त्यांच्या गाडीची गती कमी झाली व पोलिसांनी तिथेच त्यांना ताब्यात घेतले. बॅरिकेड्स तुटल्याने घाबरून गाडी वेगाने नेली, असे शेख यांनी पोलिसांना सांगितले.