पुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारकौशल्ये वाढविण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे 'उच्चस्तरीय विचारकौशल्ये' अर्थात HOTS (Higher Order Thinking Skills) हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे. पुण्यातील मेनका प्रकाशनने हे अभिनव पुस्तक प्रकाशित केले आहे.
तज्ज्ञ, अनुभवी व निष्णात शिक्षकांच्या साह्याने लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात बीजगणित, भूमिती व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सुमारे 500 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. मार्च 2012 मध्ये होणार्या दहावीच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार्या या मार्गदर्शक पुस्तकाची किंमत 140 रुपये आहे.
बीजगणित, भूमिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांच्या प्रत्येक प्रकरणावरील HOTS प्रश्न आणि त्याची उत्तरे देण्यात आली आहेत. या सोडवलेल्या उदाहरणांच्या आधारे उत्तराचे सादरीकरण कशा प्रकारे करावे, हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले आहे. शिवाय या पुस्तकात सरावासाठी 150 प्रश्नही दिलेले आहेत. महत्त्वाच्या विषयांची महत्त्वाच्या प्रश्नांची ही 'बिग बॅंक' विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तके उपलब्ध आहेत.
HOTS या संकल्पने विषयी... - शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये उच्चस्तरीय विचारकौशल्ये निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 (NCF 2005) या मसुद्यात व्यक्त केली होती. डॉ. बेंझामिन ब्लूम (1956) यांचा सिध्दांत शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. 2001 मध्ये डॉ. ब्लूम यांच्या दोन शिष्यांनी भर टाकली. त्यांनी बौद्धिक ज्ञान क्षेत्रातील वैचारिक कौशल्यांचे वर्गीकरण केले. यालाच ब्लूमचे सुधारित विचारकौशल्ये मानले जाते. तर माहितीचे विश्लेशण मूल्यमापन व नवनिर्मिती या क्षमतांना उच्चस्तरीय विचारकौशल्ये (Higher Order Thinking Skills) असे संबोधले जाते. माहितीच्या युगात सतत नवनवी माहिती मिळवण्यासाठी बरेच स्त्रोत उपलब्ध झाले आहेत. या पुढील पिढीला मिळालेल्या माहितीचे मूल्यमापन व विश्लेषण करता येणे त्यात स्वत:च्या विचारांची भर टाकता येणे ही कौशल्ये आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठीच शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये काही महत्त्वांच्या विषयांतील निवडक प्रश्न हे HOTS आधारित असावेत, असा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला आहे.