पुणे- शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील यमुनानगरसह काही जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा यमुनानगर हा प्रभाग आहे. भाजपने तो शिवसेनेला सोडूनही या जागेच्या बदल्यात आणखी पर्यायी दोन जागा सोडण्यास शिवसेनेने विरोध केल्यामुळे भाजपचे पित्त खवळले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही सूचना गेली आहे. दरम्यान, याची दखळ घेत आज मुंबईमध्ये बैठकीत होत त्यावर दोन्ही पक्षातील नेते अंतिम निर्णय घेतील.
मूळात पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना आणि भाजपची ताकद नगण्य आहे. त्यातच जागा वाटपाच्या मुद्यामुळे दोन्ही पक्षात रुसवा-फुगवा तयार झाला आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तेथे राष्ट्रवादीत बंडखोरी होईल, असे मानले जात आहे. त्याचा फायदा महायुतीला काही प्रमाणात होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महायुतीचा फुसका बार उडणार असे दिसून येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या ४५ उमेदवारांची यादी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे. या जागांवर बंडखोरी होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीने आताच आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. विरोधक प्रभव असताना युतीतील धुसफूस त्यांना महागडी ठरु शखते. भोसरी विधासभा मतदारसंघ हा शिरुर लोकसभा मतदारसंघात मोजत आहे. त्यासाठी शिरुरचे खासदार आढळराव-पाटील यांना भोसरी मतदारसंघावर एकहाती नियंत्रण ठेवायचे आहे. त्यामुळे महायुतीच्या बैठकीत आढळराव-पाटील भोसरीतील मतदारसंघातील जागांबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत.
यमुनानगरचा प्रभाग शिवसेनेला सोडावा लागल्याने भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना आपल्या प्रभागावर पाणी सोडावे लागले आहे. यमुनानगरच्या बदल्यात मोशी, गवळीनगर या जागांवर भाजपने दावा केला आहे. परंतु त्या जागा शिवसेनेने विशेषत आढळराव-पाटलांनी सोडण्यास नकार दिल्याने भाजपने हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. या जागा सोडल्या नाही तर आम्ही स्वतंत्र लढू, असा संदेश दिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा वाद पोहचला असून आज होणारया बैठकीत याबाबत काय निर्णय होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.