Home » Maharashtra » Pune » Sahara & Mca Conflicts On Stadium Name

सहारा-'एमसीए'त वादाची ठिणगी?; काळ्या कापडाने स्टेडियमचे नाव झाकले!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 16:45PM IST
सहारा-'एमसीए'त वादाची ठिणगी?; काळ्या कापडाने स्टेडियमचे नाव झाकले!
पुणे- महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आणि सहारा परिवार यांच्यात पुणेजवळील गहुंजेतील 'सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम' च्या नामकारणाचा करार मोडला असल्याचे दिसून येत आहे. 'एमसीए' बांधलेल्या या सहारा स्टेडियमचे नाव मंगळवारी काळ्या कपड्याने झाकल्याचे दिसून आले. त्यामुळे एमसीए आणि सहारा परिवार यांच्यात मोठा वाद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट संघटने (एमसीए)ने स्टेडियम बांधायला घेतले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी तत्कालीन आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सहाराने त्यात रस दाखविला. त्यानुसार या स्टेडियमला सुब्रतो राय यांचे नाव दिल्यास सहारा परिवार एमसीएला 200 कोटी देईल, अशी व्यवस्था पवारांनी केली होती. याचबरोबर पवारांच्या शब्दानुसार 'बीसीसीआय'ने एमसीएला स्टेडियम बांधण्यासाठी 50 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले होते.
त्यानंतर या नव्या स्टेडियमच्या नामकरणाचे हक्क सहारा परिवाराला 207 कोटी रुपये इतक्‍या विक्रमी किमतीला देण्याचा करार 'एमसीए'ने केला होता. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित इतक्‍या रकमेचा तसा करार होण्याची ही भारताच्या क्रीडा इतिहासातील पहिलीच वेळ होती. तेव्हापासून या स्टेडियमला 'सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम' अशा नावाने ओळखले जात आहे. तसेच या स्टेडियमला नाव दिल्यानंतर सहाराने आपल्या 'आयपीएल' टीमला सुद्धा 'सहारा पुणे वॉरिअर्स' असे नाव दिले होते.
आता मात्र अचानक सहारा व एमसीए यांच्यात वाद उफाळून आल्याचे चित्र आहे. हा वाद नेमका कशामुळे उदभावला आहे याची माहिती देण्यास सहारा व एमसीएने नकार देत हा आमचा वैयक्तिक करार असल्याचे सांगितले आहे.
पुण्यातील या स्टेडियमवर नुकताच पहिला आंतरराष्ट्रीय सामना टी-20 चा भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. सध्या 'एमसीए'चे अध्यक्ष अजय शिर्के आहेत.
Email Print
0
Comment