वाहनचोरांच्या टोळीकडून 30 लाखांचा गाड्या जप्त
पुणे - राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांतून चारचाकी वाहनांची चोरी करून त्यांची पुणे, बीड व जळगाव या शहरांत विक्री करणा-या सहा जणांच्या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून तीस लाख 50 हजार रुपये किमतीच्या चार बोलेरो, एक इंडिका, टेम्पो व ट्रक अशी सात वाहने जप्त करण्यात आली.
विक्रमसिंग राठोड (वय 24, रा.उदयपूर, राजस्थान), लक्षराज ऊर्फ पुनीत राठोड (30, रा.राजस्थान), तुषार येवले (24, रा. खराडी,पुणे) संजय आघाव (25, रा.पुणे), वाशीद ऊर्फ हाजी गुलाब शेख (48, रा.बºहाणपूर, मध्य प्रदेश) व महंमद सलाम खाँ (53, रा.निमच, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस निरीक्षक किशोर जाधव यांनी सांगितले की, येरवडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक चिमाजी मधे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येवले व आघाव हे त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनांची चोरी करून नंबर प्लेट बदलत आहेत. त्यानंतर या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून चोरलेल्या गाड्या ओळखीच्या लोकांना विक्री करत आहेत. बातमीची खातरजमा करून खराडी येथे या दोघांना सापळा रचून इंडिका कारसह अटक करण्यात आली.
जप्त केलेली कार जामखेडची - ही कार नगर जिल्ह्यातील जामखेड येथील सूर्यकांत जाधव यांची असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तसेच आरोपींकडून चोरीची सात वाहने पोलिसांनी जप्त केली. हे आरोपी स्क्रॅप झालेल्या वाहनांचे नंबर चोरलेल्या गाड्यांवर टाकत असत. राजस्थानातील दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.





