येरवडा तुरुंगातील खुनाचे मोहोळने केले पुरावे नष्ट

पुणे - इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मोहंमद कथिल सिद्दिकी (28, रा.दरभंगा, बिहार) याचा येरवडा तुरुंगात खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद मोहोळ (28, रा. पुणे) व अलोक भालेराव (22, रा. पुणे) यांनी पुरावा नष्ट केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी याबाबतचा अहवाल 15 जून रोजी न्यायालयात सादर केल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील अॅड.रोहित ताकवणे यांनी सोमवारी दिली. या आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. पाटील यांच्या न्यायालयाने 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ताकवणे म्हणाले, 8 जून रोजी सिद्दिकीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या वेळी वापरण्यात आलेली पायजम्याची नाडी मोहोळ व भालेराव यांनी जाळून त्याची राख शौचालयात टाकून दिल्याचे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.
मोहोळला कारागृहात भेटण्यासाठी कोण आले होते, या खुनाची सुपारी मोहोळे याने घेतली होती का, या गुन्ह्यात बाहेरील व्यक्तीचा संबंध आहे काय? याबाबत तपासासाठी आरोपींना न्यायालयीन कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.





