पावसासाठी सामुहिक मुंडण करून वरुणराजाला साकडे

नागपूर: पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. वरुणराजाची कृपा व्हावी, यासाठी कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही येथील शेतकर्यांनी सामुहिक मुंडण करून वरुणदेवताला साकडे घातले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मान्सूनच्या सुरूवातीला आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला होता. दमदार पाऊस झाल्यानंतर बहुतेक शेतकर्यांनी पेरण्या करून टाकल्या, परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने रोपट्यांची वाढ खुंटली आहे. सामुहिक मुंडण केल्यानंतर वरुणदेवता प्रसन्न होतो, अशा भावना या शेतकरीवर्गात व्यक्त होत आहे.
सचिन शंकरराव कपाटे (22), अमोल दामोदर खोबे(21), रोशन सूर्व भान बुरबुरे (22), रोशन गणेश गावंडे (22), चांदशाह मेहबूब शाह (22), भीमराव कृष्णाजी खादोरे (27) या शेतकरी पुत्रांनी मुंडण केले आहे. याशिवाय परिसरातील काही शेतकर्यांनी गणपती, हनुमान, शिवशंकर आणि आदीशक्तीची पूजा-अर्चा सुरु केली आहे.






