श्रीगोंदा - कुकडीच्या धरणातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय बुधवारीमुंबईत झालेल्या कालवास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चाचणीच्या नावाखाली सोमवारीच सोडलेले पाणी आवर्तनात नियमित करण्यात आले. दरम्यान, उन्हाळ्यातील पुढच्या आवर्तनाबाबत मात्र या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. याबाबत ‘दिव्य मराठी’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.
जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे, पालकमंत्री बबनराव पाचपुते, वल्लभ बेनके, राम शिंदे, श्यामला बागल हे लाभक्षेत्रातील आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्यासह पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या कुकडी लाभक्षेत्रात पाण्याची मोठी मागणी व आवश्यकता असल्याने आवर्तन लगेच सोडण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यामुळे चाचणीसाठी येडगाव धरणातून सोमवारी सोडलेले पाणी आता आवर्तनात रूपांतरित करण्यात आले आहे. या आवर्तनात पाणी ‘हेड टू टेल’ असे देण्यात येणार आहे. दरम्यान, उन्हाळी हंगामात कुकडीतून किती आवर्तने देण्यात येणार, तसेच पुढच्या आवर्तनाबाबत बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. हे आवर्तन संपल्यानंतर धरणात किती पाणी शिल्लक राहील त्याच्यावर पुढचे पाणी सोडण्याबाबत विचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीसाठी उपस्थित असणारे पुणे, नगर व सोलापूरच्या जिल्हाधिका-यांनी उन्हाळ्यासाठी अडीच टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची मागणी केली. पालकमंत्री पाचपुते यांनी ही मागणी विचाराधीन असल्याचे सांगितले.
बैठक म्हणजे निव्वळ धुळफेक - कालवास्तरीय समितीची बैठक म्हणजे निव्वळ शेतक -यांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी घेतली जाते. पाणी सोडण्याबाबतचा निर्णय जर ठरावीक भागातील शेतक-यांचे हित समोर ठेवून अधिकारी घेत असतील, तर मग अशा बैठकांसाठी थांबण्याची गरजच काय ? पुणेकरांचे पाणी कधीच बंद नसते. मात्र, त्यामुळे नगरकरांवर सतत अन्याय होत असतो.’’ - कुंडलिकराव जगताप, संस्थापक, कुकडी कारखाना.
तीन टप्प्यांत 39 दिवसांचे आवर्तन - कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनात पाच टीएमसी पाणी देण्यात येणार असून तीन टप्प्यांत 39 दिवसांत हे आवर्तन पूर्ण केले जाईल. सध्या धरणात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे शेतक-यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. गेल्या आवर्तनात जवळपास एक टीएमसी पाणी जास्त वापरले गेले. त्याचा जाब अधिका-यांना विचारण्यात आला. विरोधकांना यंदा कुकडीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणण्याची संधी न मिळाल्याने काहींची पोटदुखी सुरू आहे.’’ - बबनराव पाचपुते, पालकमंत्री.