नगर - प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पदाधिका-यांनी वेळोवेळी दाखवलेली उदासीनता यामुळे महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची अक्षरश: वाट लागली आहे. बाळचोरी प्रकरण, कर्मचा-यांना वारंवार होणारी मारहाण आणि रक्तपेढीवर झालेली कारवाई या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गरिबांना कमी खर्चात आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या पुढाकाराने देशपांडे रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे रुग्णालयातील सेवा व सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. कर्मचा-यांना वारंवार मारहाण होत असताना प्रशासन व पदाधिकारी काय करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिन्याला 500 ते 750 महिला या रुग्णालयात प्रसूत होतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अवघे दोनच कायमस्वरूपी डॉक्टर आहेत. रुग्णालयातील अनेक उपकरणे बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासनाने त्याकडे पाठ फिरवली. पदाधिका-यांना तर रुग्णालयाचे काहीच देणे-घेणे नाही. बाळ चोरीला जाणे किंवा कर्मचा-यांना मारहाण यासारखी घटना घडल्यानंतर मात्र ते सभेत ओरडा करतात. परंतु रुग्णालयातील समस्यांबाबत एकाही नगरसेवकाने ठाम भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे रुग्णालयातील समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत.
दूषित रक्तपिशव्या आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने रुग्णालयातील रक्तपेढीवर नुकतीच कारवाई करून रक्तसंकलन करण्यास बंदी घातली. या प्रकरणी आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र, रक्तपेढीतील समस्यांबाबत बोलण्यास कोणीच पुढे आले नाही. रक्तपेढीतील खराब यंत्रसामग्रीबाबत बोरगे यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
तात्पुरते सुरक्षारक्षक - देशपांडे रुग्णालयात सोमवारी परिचारिकांना मारहाण झाल्यानंतर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कायमस्वरूपी शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होईपर्यंत मनपाचे चार सुरक्षारक्षक (विनाशस्त्र) बुधवारी रुग्णालयात हजर झाले.
आता डॉ. राजूरकर आरोग्याधिकारी - दूषित रक्तपिशव्याप्रकरणी आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निलंबित केल्यानंतर आता एकात्मिक बालविकास विभागातील डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे बुधवारी या पदाची जबाबदारी देण्यात आली आहेत.