मुंबई- मुलींचा कमी होणारा जन्मदर ही गंभीर बाब असून या सामाजिक समस्येवर जागरूकता निर्माण करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी तीनदिवसीय पदयात्रेचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला गृहमंत्री आर. आर. पाटील आपल्या मुलीसह सातारा जिल्ह्यातील नायगाव येथून पदयात्रेला सुरुवात करतील. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जन्मदर कमी असणे ही बाब गंभीर आहे. पुरुषी मानसिकता, महिलांचे दुय्यम स्थान, हुंडा अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्या या प्रश्नामागे दडलेल्या आहेत. त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव असलेल्या नायगाव ते पुण्यापर्यंत या पदयात्रेचे आयोजन केल्याची माहिती सुळे यांनी दिली. पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी तीन हजार मुली आपल्या बाळाची गर्भलिंगचिकित्सा करणार नाहीत अशी शपथ घेतील, असेही त्यांनी सांगितले.
तोडफोड प्रकरणी माफी
‘देल्ली बेली’ या चित्रपटावर अश्लीलतेचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील चित्रपटगृहांची मोडतोड केली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी माध्यमांसमोर माफी मागितली. आपण कार्यकर्त्यांना हा मार्ग योग्य नसल्याचे सांगितले. त्यांनी थिएटर मालकांना पत्र लिहून आक्षेप कळवायला हवे होते, असे त्या म्हणाल्या.
तुमचे विचार(2)