राजकोट: गुजरातमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या भवनाथ यात्रेत रविवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. यात 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 27 जखमी झाले.
गिरनार पर्वतराजीच्या पायथ्याशी जुनागड जिल्ह्यात हे भवनाथ मंदिर आहे. ब्रेक निकामी झालेल्या दोन बस यात्रेत घुसल्याची अफवा पसरल्याने हजारोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. मंदिराच्या मुख्य र्मगावर वाहतूक जाम झाल्याने जखमींना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही अडकून पडली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मोरारीबापू परतले : ही घटना घडली तेव्हा राष्ट्रसंत मोरारीबापू जुनागडमध्ये होते. भवनाथ मंदिर देवस्थानाकडे जाणार्या मार्गावर वाहतूकीची कोंडी झाल्यामुळे त्यांना परतावे लागले.
23 वर्षांपूर्वी येथे गिरनार पर्वत चढताना शिडी तुटल्याने 3 भाविकांचा मृत्यू झाला होता. 2006 मध्ये पावागडमध्ये नवरात्र महोत्सवात चेंगराचेंगरी होऊन 11 भाविकांचे प्राण गेले होते.