शरद पवारांच्या घरावर अण्णासमर्थक धडकले

नवी दिल्ली- टीम अण्णाच्या कथित समर्थकांनी सोमवारी कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘6 जनपथ’कडे मोर्चा वळवला. घरासमोर उग्र निदर्शने करणा-या सुमारे 50 तरुणांनी इमारतीच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा जवानांनी त्यांना रोखले.
अण्णा समर्थकांनी घरासमोर निदर्शने केलेले शरद पवार यूपीए सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या घराबाहेर अशी निदर्शने करण्यात आली होती. टीम अण्णाने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या प्रकरणांत ज्या पंधरा मंत्र्यांची नावे दिली आहेत त्यातील हे तीन मंत्री आहेत.
सरकारविरोधी लाट
सामान्य जनतेमध्ये सरकारविरोधी लाट असल्याचा दावा टीम अण्णाने सोमवारी केला. सक्षम लोकपाल विधेयक लवकरात लवकर मांडावे अन्यथा सत्तेतून पायउतार व्हावे, असे आव्हान अण्णा हजारे यांनी दिले. दरम्यान, योगगुरू रामदेवबाबा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर हजेरी लावल्याबद्दल संतप्त झालेल्या टीम अण्णाने भूमिका थोडी सौम्य केली.





