नवी दिल्ली - भोपाळ गॅसकांडातील आरोपी कुख्यात कंपनी डाऊ केमिकल्स कृषी मंत्रालयाच्या आयोजनामध्ये प्रायोजकाची भूमिका निभावत आहे. कृषी मंत्रालयाच्या कृषी शिक्षण आणि संशोधन विभागाच्या (डेअर) अंतर्गत स्वायत्त संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद जीएम फूड आणि प्लँट बायोटेक्नॉलॉजी विषयावर हे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले असून तो 24 तारखेपर्यंत चालणार आहे.
लंडन ऑलिम्पिकच्या प्रायोजकपदी डाऊ केमिकल्स असण्याबद्दल सध्या विरोध होत आहे. डाऊ केमिकल्सकडून प्रायोजकपद काढून घेण्यात यावे, यासाठी मोठा दबाव आहे. या पार्श्वभूमीवर डाऊ केमिकल्सच्या प्रायोजकत्वाबाबत वादंग निर्माण झाले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आयोजनामध्ये डाऊ अॅग्रो सायन्सेस या नावाखाली ही कंपनी प्रायोजक झाली आहे. 1989 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही कंपनी डाऊचे स्वामित्व असणारी सहयोगी कंपनी आहे. पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी ही कंपनी नवीन तंत्रज्ञानाला चालना देत आहे. यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कृषी मंत्रालयाच्या या संस्थेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश प्लँट बायोटेक्नॉलॉजी किंवा जीन रिव्होल्यूशनच्या माध्यमातून अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करणे हा होय. जैवतंत्रज्ञानावर आधारित म्हणजेच जीएम फूड तंत्रज्ञानावर देशभरातून टीका होत आहे. बीटी कॉटन आणि बीटी वांग्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे भारतीय जैवतंत्रज्ञान नियामक प्राधिकरण विधेयक 2011 म्हणजेच बीएआरआय विधेयक संसदेमध्ये सादर होऊ शकले नाही.
या कार्यक्रमामध्ये डाऊसोबत भारत सरकारमधील काही विभाग सहभागी आहेत. यामध्ये बायोटेक्नॉलॉजी विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा समावेश आहे. बीटी कॉटन प्रकरणातील वादग्रस्त कंपनी मोनसेटो या प्रायोजकत्वाच्या सूचीमध्ये आहे. यासंदर्भात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक हरिशंकर गुप्ता यांना विचारले असता, त्यांनी याचे खापर नॅशनल रिसर्च सेंटर ऑन प्लँट बायोटेक्नॉलॉजीचे प्रकल्प संचालक डॉ. आनंद कुमार यांच्यावर फोडले. ही कंपनी जीएम फूड तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर असल्यामुळे त्या कंपनीला प्रायोजकत्व देण्यात आल्याचा खुलासा त्यांनी दिला. या कार्यक्रमामध्ये डाऊ केमिकल्सचा सहभाग खेदजनक असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणवादी मीरा शिवा यांनी दिली आहे. डाऊला प्रायोजकत्व देणे म्हणजे भोपाळ गॅसकांडाच्या भीतिदायक स्मृतींना उजाळा देण्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले.