नवी दिल्ली - भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थापन करण्यात आलेल्या मंत्री उच्चाधिकारप्राप्त मंत्री गटाच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकारांना कात्री लावण्याबाबत बुधवारी चर्चा झालीच नाही. निवडणूक आचार संहितेला कायदेशीर स्वरूप देण्याबाबत या बैठकीत विचार केला जाऊ शकतो, अशा बातम्या मंगळवारी आल्या होत्या.
केंद्रीय अर्थ मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्री गटाची बैठक झाली. या बैठकीत सरकारी खरेदीबाबत कायदा करण्याच्या मुद्यासह अन्य बाबींवर विचारमंथन करण्यात आले. आपल्या मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊनही आदर्श आचार संहितेच्या मुद्यावर निष्कारण संशय निर्माण करण्यात आल्याचे कंपनी कार्मिक विषयक मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी बैठकीनंतर सांगितले.भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थापन करण्यात आलेल्या मंत्री गटाला ज्या मुद्यावर चर्चा करायची आहे, त्यामध्ये निवडणूक आचारसंहितेचा समावेश नाही. सूचना आल्या असतील, यापुढेही येत राहतील मात्र या मंत्री गटाचा तो विषय नाही, असे नारायण स्वामी म्हणाले.