नवी दिल्ली - भारतातील बिझनेस स्कूल्सने आंतरराष्ट्रीय रोजगार नियोक्त्यांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले असून आशिया- प्रशांत प्रदेशातील दहा अव्वल बिझनेस स्कूलमध्ये भारतातील चार बिझनेस स्कूलने स्थान पटकावले आहे.
या वर्षी भारतातील बिझनेस स्कूलबाबत आंतरराष्ट्रीय नियोक्त्यांच्या मतामध्ये लक्षणीय परिवर्तन झाले आहे, असे क्यूएस ग्लोबलच्या 200 बिझनेस स्कूलच्या अहवालात म्हटले आहे. आशिया- प्रशांत प्रदेशातील 36 टॉप बिझनेस स्कूलमध्ये ऑस्ट्रेलियातील तब्बल 11 असला तरी भारताच्या बिझनेस स्कूलनी लक्षणीय प्रगती केली आहे. भारतातील सहा स्कूल या यादीत असून टॉप टेनमध्ये चार बिझनेस स्कूलचा समावेश झाला आहे. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (दुसरा क्रमांक), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू (पाचवा क्रमांक), इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (सातवा क्रमांक) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता (आठवा क्रमांक) यांचा समावेश आहे. आशिया- प्रशांत प्रदेशातील बिझनेस स्कूल जागतिक एमबीए शिक्षणामध्ये आपला पाया मजबूत करीत आहेत. क्यूएस ग्लोबल 200 बिझनेस स्कूलच्या यादीत 2004 मध्ये आशिया- प्रशांत क्षेत्रातील केवळ 10 बिझनेस स्कूलचा समावेश होता. ती संख्या यावर्षी 36 वर पोहोचली आहे.