इंदूर: इंदूर जिल्ह्यातील एकतासा गावातील नागरिकांनी परस्पर सहकार्यातून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नदीवर पूल बांधण्याची मागणी सरकारकडे करूनही ती पूर्ण होत नसल्याचे बघून या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या नदीवर पाळण्याचा पूल बसवला आहे.
एकतासा गावाच्या एका बाजूने चंबळ नदी तर दुस-या बाजूने बागेडी नदी वाहते. त्यामुळे या गावाची भौगोलिक रचना एखाद्या बेटाप्रमाणे आहे. सुमारे आठ महिने नदीपात्रात पाणी असते परंतु पावसाळ्याच्या चार महिन्यांत तर दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असल्याने एकतासा गावासह आसपासच्या गावांचा या इतर गावांशी संपर्क तुटत असे. या अडचणीबाबत प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी, निवेदने करूनही पोकळ आश्वासनांखेरीज गावक-यांच्या हाती काहीही आले नाही.
गावात एकच प्राथमिक शाळा असून या शाळेतील सर्व वर्गांना मंगला कुशवाह या एकच शिक्षिका शिकवतात. गेल्या जुलै महिन्यात नदीला आलेल्या पुरात या शिक्षिका वाहून जात असताना काही नागरिकांनी धाडस दाखवून पाण्यात उडी घेऊन त्यांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी नदीवर पूल बसवण्याचा निर्धार केला व लोकवर्गणीतून 70 हजार रुपये गोळा करून नदीवर पाळणा पूल बसवला. या पुलासाठी एकूण सव्वा दोन लाख रुपये खर्च आला. सुमारे दीड लाख रुपयांची उधारी गावकरी टप्प्याटप्प्याने चुकवत आहेत.