नवी दिल्ली, कोची - इटलीच्या सुरक्षा रक्षकांकडून दोन भारतीय मच्छिमारांना ठार मारण्याच्या प्रकरणात बुधवारी भारत आणि इटलीने आपली बाजू कायम ठेवली. हे प्रकरण देशाच्या कायद्याअंतर्गत सोडविले जावे, असे भारत सरकारचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात झाल्याचे इटलीने म्हटले आहे.
इटलीचे विदेश उपमंत्री स्टेफान डी. मिस्तुरा बुधवारी सकाळी नवी दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी विदेश राज्यमंत्री परणीत कौर यांच्याशी चर्चा केली. मात्र, दोन्ही पक्ष आपआपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने त्यातून मार्ग निघू शकला नाही. आमची न्यायव्यवस्था निष्पक्ष असल्यामुळे या प्रकरणाचा निवाडा देशाच्या कायद्यानुसार केला जावा, असे कौर यांनी सांगितले.
दुसरीकडे मिस्तुरा यांनी इटलीची बाजू मांडत सांगितले की, ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात घडली असल्यामुळे खटला त्यानुसार चालवला जावा. या दु:खद घटनेचे शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघणे आवश्यक आहे. यावर चर्चा सुरू राहणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही देशांतील संबंधही महत्त्वाची बाब आहे, असे मिस्तुरा यांनी सांगितले. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी सांगितले की, इटलीच्या दोन्ही सुरक्षा रक्षकांविरुद्ध खटला चालविण्याचा सरकारला अधिकार आहे. कोल्लम पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
सुरक्षा रक्षक हायकोर्टात पोहोचले : आपल्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोपी सुरक्षा रक्षक लातोर मॅसिमिलिआनो आणि सालवातोर जिरोन यांनी केरळ हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. ही घटना भारतीय सागरी क्षेत्राच्या बाहेर घडल्यामुळे इथे खटला चालवला जाऊ शकत नसल्याचे या दोघांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
मृतांच्या पत्नीने मागितली 1 कोटी रुपयांची भरपाई : मृत मच्छिमारांच्या पत्नीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली असून त्यांनी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. याबरोबर इटलीचे जहाज एनरिका लेक्सीच्या मालकाला 25 लाख रुपयांची बॅँक गॅरंटी जमा करण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत बँक गॅरंटी दिली जात नाही, तोपर्यंत जहाजाला जाऊ देऊ नये, असे निर्देश कोर्टाने बंदरातील अधिकार्यांना दिले आहेत.15 फेब्रुवारी रोजी कोल्लम किनारपट्टीनजीक इटालियन ऑईल टँकर एनरिका लेक्सीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांच्या नौकेवर गोळीबार केला होता. यात 2 भारतीय मच्छिमार ठार झाले होते.