एमबीबीएस सीईटी आता फक्त हिंदी, इंग्रजीतूनच
नवी दिल्ली - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पुढील वर्षापासून लागू होत असलेली कॉमन एन्ट्रन्स टेस्ट फक्त हिंदी आणि इंग्रजी या भाषांतच देता येऊ शकेल. यामुळे प्रादेशिक भाषांत ही परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणा-यांची अडचण होऊ शकते.
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने 2012-13 मध्ये होत असलेली कॉमन एन्ट्रन्स टेस्ट केवळ दोनच भाषांत घेतली जावी, अशी शिफारस केली आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी होणार आहे. सध्या गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडूसह सहा राज्यांत प्रादेशिक भाषांतही ही परीक्षा घेतली जाते. एमबीबीएससाठी पुढील सत्रात होणारी पहिली प्रवेश परीक्षा सीबीएससीच्या मदतीने घेतली जाईल. प्रादेशिक भाषांतील प्रश्नपत्रिकेचा अनुवाद करणे अत्यंत कठीण काम असून त्या भाषांतील प्रश्न निवडताना ते पेपर फुटण्याची अधिक शक्यता असल्याचे एमसीआयने आरोग्य
मंत्रालयाला कळवले आहे. मंत्रालयानेही याला मंजुरी दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर केला जात आहे. अधिसूचना निघाल्यानंतर मात्र हे शक्य होणार नाही.




