Home » National » Delhi » Nbt Produce Translators Datebase

एनबीटी भाषांतरकारांचा डाटाबेस तयार करणार

वृत्तसंस्था | Feb 14, 2013, 07:47AM IST
एनबीटी भाषांतरकारांचा डाटाबेस तयार करणार

नवी दिल्ली - विविध भाषांतील साहित्यकृती अन्य भाषेत येण्यासाठी प्रकाशकांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागते. प्रकाशकांची अडचण व भाषांतरकाराची गरज लक्षात घेता नॅशनल बुक ट्रस्ट(एनबीटी) राष्‍ट्री य स्तरावर भाषांतरकाराचा डाटाबेस तयार करत आहे.

एनबीटीकडे प्रादेशिक भाषांसाठी वेगवेगळे संपादक आहेत. कोणत्या भाषेतील कोणते पुस्तक भाषांतरित व्हावे, याचा निर्णय संपादक घेतात. भाषांतर ही तेवढी सोपी गोष्ट नसल्यामुळे आम्ही राष्‍ट्रीयस्तरावर भाषांतरकाराचा डाटाबेस तयार करत असल्याचे एनबीटीचे अध्यक्ष ए. सेतूमाधवन यांनी सांगितले. दिल्ली साहित्य महोत्सवातील समारोप कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.

भारतीय राज्यघटनेत 22 भाषांना अधिकृत मान्यता आहे. मात्र, एनबीटी एका पुस्तकाचा 30 पेक्षा अधिक भाषेत अनुवाद करते. भाषांतरकाराशिवाय ते शक्य नाही, असे सेतूमाधवन म्हणाले. भारतात साहित्याचा खजिना आहे, यावर त्यांनी भर दिला.

प्रख्यात भाषांतरकार अरुणव सिन्हा म्हणाले की, भाषांतर करताना अपशब्द येऊ न देणे हे सर्वात कठीण काम आहे. प्रत्येक शब्दाला सांस्कृतिक व ऐतिहासिक संदर्भ असतात. त्यामुळे अचूक भाषांतरातून उतरलेले पुस्तक मूळ साहित्याएवढेच परिणामकारक ठरते. कादंबरीकार मरिअम करिम म्हणाले, प्रत्येक भाषेला निरनिराळी संवेदना असते. मूळ भाषेतील आशय अन्य भाषेतील पुस्तकात तेवढ्याच ताकतीने उतरला पाहिजे.

प्रकाशकांसाठी ‘राइट्स टेबल’चे आयोजन
भारतीय साहित्यकृतींना विदेशात स्थान मिळावे, तसेच परदेशातील दर्जेदार पुस्तके भारतीय भाषेत उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी एनबीटीने देश-विदेशांतील प्रकाशकांच्या हक्कासाठी ‘न्यू दिल्ली राइट्स टेबल’चे आयोजन केले होते, असे सेतूमाधवन यांनी सांगितले. वर्ल्ड बूक फेअरमध्ये न्यू दिल्ली राइट्स टेबलचा मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये हिंदी, इंग्रजी व अन्य भारतीय भाषेतील पुस्तकाच्या भाषांतराचा करार करता यावा यासाठी देश-विदेशातील प्रकाशकांना एकमेकांशी थेट संवाद साधता आला.

Email Print
0
Comment