भोपाळ/बैतूल: सासरी केवळ शौचालय नसल्यामुळे लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांत माहेरी पळून आलेली मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आदिवासी महिला आता स्वच्छता अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. त्या नवविवाहितेचे हे धाडस पाच लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरीही ठरले आहे.
ही घटना आहे बैतूल जिल्ह्यातील जीतूधाना गावातली. सासरी शौचालय हवेच असा अनिता नार्रे या नवविवाहितेचा आग्रह होता. पण सासरी ते नसल्यामुळे ती माहेरी पळून गेली. बायको पळून गेल्यामुळे तिच्या नव-याने ग्रामपंचायतीकडे शौचालयासाठी पाठपुरावा केला. एवढेच नाही तर सुलभ इंटरनॅशनलने अनिताच्या या गावची निवड ‘संपूर्ण स्वच्छता अभियाना’साठी केली असल्याची माहिती सुलभ इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी दिली. डॉ. पाठक यांचे तब्बल 24 भाषेतील शौचालयावरील पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे. देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला या पुस्तकाच्या प्रत्येकी पाच प्रती दिल्या जाणार आहेत.
...अन् तिने दिला स्पष्ट शब्दांत नकार
24 वर्षीय अनिताचा शिवराम नार्रेशी 13 मे 2011 रोजी विवाह झाला. नांदायला आल्यानंतर सासरी शौचालय नसल्याचे पाहून तिला धक्काच बसला. खेड्यामध्ये कुणाच्याही घरी शौचालय नसल्यामुळे सगळेच उघड्यावरच प्रातर्विधीसाठी जातात. ही वस्तुस्थिती पाहून अवघ्या दोनच दिवसांत अनिता माहेरी चिंचोलीला निघून आली. चिंचोली हे निमशहरी गाव आहे. शिवराम तिला घ्यायला आला तेव्हा शौचालय नसल्यामुळे त्याच्याबरोबर जाण्यास अनिताने स्पष्ट शब्दांत नकार दिला. जोपर्यंत शौचालय बांधणार नाही, तोपर्यंत नांदायला जाणार नसल्याचे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले. अनिताच्या नकारामुळे नाराज झालेल्या शिवरामने शौचालयाचा मुद्दा ग्रामपंचायतीकडे लावून धरला आणि ग्रामपंचायतीने त्याला शौचालय बांधण्यास मदतही केली. शौचालय बांधल्यानंतर अनिता आनंदाने परतली.
धाडस तरुणींसाठी प्रेरणादायी
आपले वैवाहिक जीवन धोक्यात घालण्याच्या धाडसाबद्दल आम्ही अनिताला 5 लाखांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. अनिताचा हा निर्णय अन्य मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जेव्हा त्यांचे पालक लग्न जमवायला जातील तेव्हा या मुलीही आपल्या भावी नव-याच्या घरी शौचालय आहे की नाही, हे आधी पाहायला लागतील.
डॉ. बिंदेश्वर पाठक, अध्यक्ष, सुलभ इंटरनॅशनल
आशेचा नवा किरण
शौचालयासाठी आपले वैवाहिक जीवन धोक्यात घालणारी अनिता केवळ तिच्या गावातील महिलांसाठी आशेचा किरण बनली नाही, तर जिल्हा प्रशासनाच्या नजरेतही ती आयकॉन ठरली आहे. ग्रामीण व शहरी भागात शौचालय बांधणी आणि स्वच्छता मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनिताची नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
चंद्रशेखर बोरकर, जिल्हाधिकारी, बैतूल