‘तत्काळ’चे नियम अधिक कडक

नवी दिल्ली - तत्काळ आरक्षणासाठी रेल्वेने आपले नियम अधिक कडक केले आहेत. अशा प्रकारच्या आरक्षणासाठी प्रत्यक्ष प्रवासाला जाऊ इच्छिणा-या प्रवाशाचे छायाचित्रासह ओळखपत्र देणे रेल्वेने यापूर्वीच बंधनकारक केले आहे. आता हा नियम अधिक कडक करण्यात आला असून, यापुढे केंद्र किंवा राज्य शासनाने जारी केलेले, अनुक्रमांक असलेले ओळखपत्रच तत्काळ आरक्षण सुविधेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. शिधापत्रिकेच्या ओळखपत्रावरही जर प्रत्यक्ष प्रवासाला जाऊ इच्छिणा-या प्रवाशाचे छायाचित्र असेल, तरच तत्काळ आरक्षण मिळू शकणार आहे. तत्काळ आरक्षणाच्या नियमात रेल्वेने नुकताच हा बदल केला आहे.
या बदलाबाबत रेल्वेच्या सर्व विभागांच्या प्रमुखांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. या नव्या नियमानुसार आता कोणत्याही परिस्थितीत अनुक्रमांक नसलेल्या ओळखपत्राच्या आधारे तत्काळ आरक्षण मिळू शकणार नाही. प्रवाशांनी अशी ओळखपत्रे दाखवल्यास ती ग्राह्य न धरण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. दलालांच्या कचाट्यातून प्रवाशांची सुटका करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने गेल्या महिन्यातच तत्काळ आरक्षणाबाबतच्या नियमात सुधारणा केली होती. आरक्षण कार्यालय सुरू झाल्यावर पहिले दोन तास दलालांना तत्काळ आरक्षण देण्यास मज्जाव करण्यात आला. यापूर्वी कामकाज सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच तत्काळ कोट्यातील सर्व तिकिटे संपून जात. त्यामुळे दलालांना सकाळी आठ ते दहा या वेळेत तत्काळ आरक्षण सुविधेअंतर्गत तिकिटे देण्यास मनाई करण्यात आली आहे. इंटरनेटवरूनही सकाळी आठ ते दहा या दोन तासांत तत्काळ आरक्षण करण्यास दलालांना मज्जाव करण्यात आला आहे. प्रवाशांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर याबाबतच्या नियमांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे.
‘तत्काळ’चे नवीन नियम
१> तत्काळ आरक्षणासाठी फक्त अनुक्रमांक असलेले छायाचित्र ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार.
२> गाडी रद्द झाली किंवा उशीरा धावत असेल, तरच तत्काळ आरक्षण रद्द होवू शकेल. अन्य कोणत्याही कारणास्तव आरक्षण रद्द होणार नाही.
३>प्रवास सुरू करण्याच्या एक दिवसपूर्वीच तत्काळ आरक्षण होवू शकेल.
४> सकाळी 8 ते 10 या वेळेत दलालांना प्रत्यक्ष आरक्षण कार्यालयातून तसेच इंटरनेट वरूनही तिकिट खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.




