दिशाभूल केल्याने काँग्रेस पराभूत; यूपी नेत्यांचे राहुल गांधी यांच्याकडे गार्हाणे

लखनऊ- काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे राज्यात पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. याविषयीची वास्तव वा गार्हाणे शुक्रवारी सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासमोर मांडण्यात आले. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्याकडे पक्षाच्या स्थितीवर चर्चा केली.
राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांची शुक्रवारी भेट घेऊन निवडणुकीतील पराभवावर चर्चा केली. त्याचबरोबर तळागाळात पक्षाचे स्थान काय आहे, याची माहिती देखील राहुल यांना दिली. एनएसयुआयमध्ये 1990 पासून काम करणार्या एका नेत्यांनी राहुल यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केली. तळागाळातील कार्यकर्त्यांची मते जाणून न घेता राज्याची स्थिती ठराविक लोकांकडून घेण्यात आली. त्यांनी राज्यातील परिस्थितीविषयी राहुल यांना चुकीची माहिती दिली. त्यातूनच पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असे एनएसयुआयच्या नेत्याने राहुल यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनात पराभवाची मीमांसा करताना 12 मुद्दे मांडण्यात आले. यात केंद्रिय पदाधिकारी समिती व जिल्हा, शहर समिती यांच्यातील समन्वयाचा अभाव, केंद्राने तयार केलेल्या योजनांची माहिती नीटपणे राज्यातील जनतेपर्यंत पोहचवण्यात प्रदेश काँग्रेस शाखेला आलेले अपयश अशी कारणांची जंत्री त्यात आहे. कानपूर रॅलीत राहुल गांधी यांनी 'जेल भरो' ची हाक दिली होती. त्याचबरोबर भट्ट परसोल प्रकरणात शेतकर्यांच्या रॅली घेण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात काँग्रेस प्रदेश शाखा कमी पडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. झांसी व पाड्रोना विधानसभा मतदारसंघातून आपल्या प्रतिनिधींना निवडून आणण्यात दोन केंद्रीय मंत्र्यांना अपयश आले. राज्यात निवडणुकीची कोणावरही जबाबदारी टाकण्यात आली नव्हती, हे देखील अपयशाचे एक कारण असल्याचे काही नेत्यांनी सांगितले.
सपाच्या माजी कार्यकर्त्यांना तिकिटे- उत्तर प्रदेशात काँग्रेस सत्ता आणण्याचे स्वप्न पाहत होती. परंतु तसे काहीही घडले नाही. उलट निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या माजी कार्यकर्त्यांना काही ठिकाणी तिकिटे देण्यात आल्याचा विचित्र प्रकार राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. गया, इटवाह, मैनपुरी, फरुखाबाद, ओरय्या, कानपूर, कन्नौज येथे सपाच्या माजी कार्यकर्त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती, असे काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी राहुल यांना सांगितले.
नवख्यांना पदे- पक्षात किमान 3 वर्षे काम केल्याशिवाय पद देण्यात येत नाहीत, असा नियम असताना त्याचे उल्लंघन करण्यात आले. अनेकांना नियम डावलून उच्च् पदे देण्यात आली. त्यातून तळागाळात काम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती, असे काँग्रेस नेत्यांनी राहुलना सांगितले.





