आजकाल मित्र मिळणे अवघड बनले आहे आणि मैत्री हा चक्क धंदा बनला आहे. ज्या वयात मित्र बनवता येतात, त्या वयात अभ्यास, करिअरचा ताण एवढा असतो की प्रत्येक नातेसंबंध फक्त देण्या-घेण्याचेच होतात. आपण एक प्रयोग करूयात, बाहेरच्या जगात कुणी मित्र होऊ शकत नसेल आणि जे जुने मित्र आहेत ते काळाच्या उदरात कुठे गडप झाले असतील किंवा सगळे आपापल्या दुनियेत मश्गुल असतील तर घरातच मैत्री करूया.
भारतीय कुटुंबामध्ये नातेसंबंध आहेत पण मैत्री नाही. आपण नात्यांना महत्त्व देतो, मैत्रीला नाही. त्यामुळे पती-पत्नी हे फक्त एक नाते राहते, त्यात मैत्रीचा धागा निर्माण होत नाही. दोघे एकमेकांसाठी जे करतात ते त्यांच्या नात्याला जागून करतात, मैत्रीच्या भावनेतून नाही. पिता-पुत्र, आई-मुलगी यांच्याबाबतीतही हेच घडते. त्यामुळेच काही काळानंतर ही नाती ओझे वाटायला लागतात. पण मैत्री मात्र सदाबहार असते, कायम टवटवीत असते.
कुटुंबाचा आधार प्रेम असायला हवा. या प्रेमाची सुरुवात मैत्रीतून करा. कारण मैत्रीचेच प्रेमात रूपांतर होऊ शकते. ज्या क्षणी संबंधांमध्ये प्रेम उत्पन्न होईल त्या वेळी मांगल्य, शांती आपसूक येईल. आज काय होते, एक दुसर्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यातून आवेश उत्पन्न होतो. पण मैत्री आणि प्रेमभाव असेल तर क्षमा करण्याचा भाव जागृत होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये अपेक्षाच महत्त्वाच्या असतात. अपेक्षा अशांततेचे मूळ असते. प्रेम अपेक्षेचे रूपच बदलून टाकते. एकदा का अपेक्षा संपली की, दुसर्याला दोष देणे बंद होईल. कारण प्रेम मध्ये आले की आपण प्रत्येक नात्यात परमात्म्याला पाहू शकू. यालाच वैकुंठ म्हणतात.