ईश्वरी नियमांमध्ये कर्माची फळे भोगणे क्रमप्राप्त आहे

श्रीकृष्ण आणि सुदामा हे एकाच गुरूचे दोन शिष्य होते. श्रीकृष्ण राजांचे राजा होऊन कर्म केले, वेळप्रसंगी अर्जुनासाठी सारथी बनले. दुसरीकडे सुदाम्याला मात्र भगवान श्रीकृष्णाची कृपा होईपर्यंत भीकच मागून जीवन व्यतीत करावे लागले.
भगवान श्रीकृष्णाला सर्व ज्ञात होते. मात्र, कर्मफळ भोगणे हा नियम त्यांनीच घालून दिलेला आहे. प्रत्यक्ष कर्माची फळे भोगल्याशिवाय जीवनाची ज्ञानप्राप्ती होत नाही. नियमाने कर्माची फळे भोगावीच लागतात. त्यामुळे सुदामा, द्रौपदी, कुंती, सुभद्रा आदी व्यक्तिमत्त्वे अतिप्रिय असूनही श्रीकृष्णाने त्यांना दु:ख भोगू दिले. आपल्याद्वारे निर्मिती केलेल्या सृष्टीमध्ये सर्व काही होऊ देणे आणि ते पाहणे भगवान अवलंबतात. त्यामुळे जीवनातील पात्रांना ते त्यांची भूमिका बजावू देतात. आपले गुणधर्म निभावण्यालाही आपण कर्म म्हणू शकतो. आपले गुणधर्म परिवर्तनही ईश्वर इच्छेनुसारच होते. मात्र, साधकाला प्रयत्न करणे आवश्यक असते. आपली बुद्धी वापरून कुशलता दाखवणे गरजेचे असते.
भक्ताच्या हातामध्ये प्रार्थना हे शस्त्र असते. आर्ततेने, अर्थार्थी बनून ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून प्रार्थना करणे आपल्या हातामध्ये असते. सर्वज्ञाला आपण बोलावण्याचा हा एकदम सोपा मार्ग आहे.
वेत्ता सी वेद्यं च परं च धम,
त्वया ततं विश्वमनन्त रूप ।।
हे परमात्मा आपण सर्वज्ञानी आहात. योग्यांना समजून घेण्यासारखा योगदेखील आपणच आहात आणि स्वर्गदेखील आपणच आहात. हे अनंतरूप हे विश्व तुझ्याने व्याप्त आहे, याची जाणीव आपल्याला असावी. अशा विश्वात्मा, विश्वव्यापी परमात्म्यासमोर आपण वारंवार नमन करून प्रार्थना करण्याशिवाय आपल्यासमोर बाकी काय राहते. अर्थातच काहीच नाही. ते आपल्या अंतरमनामध्ये बसून कर्मप्रवृत्तीची आज्ञा देत असतो. त्यांची आज्ञा मंगलकारी असते. हा अनुभवदेखील कृपा साध्य आहे.







