जाहिरात
 
 
 

का भरकटत आहे तरुणाई? का वाढतय गैरवर्तन?

 
Source: दिव्य मराठी नेटवर्क   |   Last Updated 11:51(21/02/12)
 
 
 

मुला-मुलींमधील दिसणारे अश्लील चाळे ही केवळ जळगाव- भुसावळचीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शहरातील सार्वत्रिक समस्या झाली आहे. बदल हा विकासाचा आणि निसर्गाचा न थांबणारा नियम आहे व गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलली आहे, त्याचेच हा परिणाम आहेत. जागतिकीकरणाने जीवनमूल्ये आणि नैतिकता प्रभावित झाली आहे. सतत येत असलेल्या गैरवर्तनाच्या बातम्यांमुळे भुसावळ येथील 'वेलनेस फाउंडेशन'ने जनजागृती, विद्यार्थी कल्याण व सामाजिक सुधारनेचे उद्धिष्ट ठेवून बिघडत असलेल्या तरुणाईवर मनोवैज्ञानिक संशोधन व सर्वेक्षण केले होते.

'वेलनेस फाउंडेशन' अंतर्गत मनोवैज्ञानिक काउंसलर निलेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार चमुने तरुणाई व त्यांच्याशी निगडीत सवयी, मानसिकता व इतर विविध विषयांवर अध्ययन, सर्वेक्षन व संशोधन केले. मुले वाईट का वागतात? त्यांना वाईट सवयी का लागतात? व त्यामागच्या काही अत्यंत महत्वपूर्ण बाबीसमोर आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे...

सर्वसामान्य कल:

आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे आपण साक्षीदार असतो. या सर्व घटनांबद्दलची संवेदनशीलता व्यक्तिपरत्वे भिन्न असते. अश्लील चाळे, गैरवर्तन किंवा असामाजिक कृत्य अशा अतिशय गंभीर विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविनिम करण्यास लोक अनुत्सूक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता ही कायदा – सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती लपत वा बदलत नाही तर अधिकच बिकट होत जाते.

मुलांची मार्मिक मते:

निलेश गोरे व त्यांच्या टीमने सर्वेक्षणामध्ये मुलामुलींसोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चर्चा केली व त्यात प्रत्यक्ष मुलांची मते थोडी वेगळी आहेत, मुलं सरळ आणि बेधडक विचारतात , आमच्याच नात्यावर तालिबानी कायदे का? आम्ही कुठे जावे? तुम्ही आम्हाला गार्डनमध्ये फिरु देणार नाही. वर्गात मुलीशी बोललो तर तेही तुम्हाला चालत नाही. आमच्याशी बोलायला कुणाला सवड नाही. गप्पा मारायला मम्मी-पप्पा रिकामे नाहीत. आमच्या पाठीवरून हात फिरवणारा कोणीच नाही. एखाद्या मुलीने एखाद्या मुलाच्या हाताला जरी स्पर्श केला तरी त्यात तुम्हाला वासनाच दिसते. आम्ही रस्त्यावर बोलताना दिसलो तरी लगेच संशय घेतला जातो. आम्ही आमच्या वयाच्या मुला मुलींशी बोलण्यासाठी मग जायचे कुठे? मग आम्ही मुला-मुलींनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या तर कुणाचे काय बिघडणार आहे? मित्र आणि मैत्रिण म्हणून आम्ही फिरायला जायचे नाही का? मैत्रीमुळे माणसाला जगण्याची ताकद मिळते. आपले दु:ख शेअर करायला मिळते. मग आमच्याच नात्यावर तालिबानी कायदे का? काहीजण नैतिकतेचे उल्लंघन करतात म्हणून सगळेच लफंगे नसतात?

निलेश गोरे सांगतात की, विषय इतका संवेदनशील आहे की ‘कोण्या एकाला दोष देवू शकत नाही आणि कोण्या एकाच्याच बाजूने कल देवू शकत नाही. आपल्याला पालक, शिक्षक, मुले व समाज या सर्वांच्या दोनी बाजू समानतेने पाहणे गरजेचे आहे. व्यक्ती वाईट नसते, वृत्ती वाईट असते.

प्रबोधन आणि प्रतिबंध:

सर्वेक्षणात असे आढळून आले की दुर्दैवाने अनेकदा आपले व्याप, इतर सांसारिक व व्यावसायिक जबाबदार्‍या सांभाळताना आईवडिलांचे अनेकदा मुलांकडे दुर्लक्ष होते. प्रबोधन करणे आणी प्रतिबंध करणे हे उपाय आहेतच पण योग, ध्यान याच्या माध्यमातुन देखील मानसिकता बदलण्याची गरज आहे. पालकांचं प्रबोधन करणं तसचं मुलांना अशा धोक्यांपासून सावध करणं खुप महत्वाच आहे.

स्पर्धा, शिक्षक आणि पालक:

सर्वेक्षणानंतरच्या अध्ययनावरून निलेश गोरे सांगतात की असे दिसून येते की व्यवसायातील संघर्षामुळे, बाजारीकरणामुळे, प्रसारमाध्यमांमुळे आणि सामाजिक, कौटुंबिक भान हरवल्यामुळे श्लील आणि अश्लील यांतील सीमारेषा आता पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. मुलांचे गैरवर्तन थांबवायचे असेल तर शिक्षकांनी आणि पालकांनी मित्राच्या भूमिकेतून मुलांना समजून घेण्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण काही ठिकाणी आईवडील दोघेही नोकरीत व्यस्त असल्याने तर काही ठिकाणी आधुनिकीकरणाचे अनुकरण यामुळे मुलांना भावनिक ओलावा देण्यासाठी कुणाकडेही वेळ उरला नाही. विभक्त कुटुंबे वाढल्यामुळे पूर्वीप्रमाणे आता घरा घरात आजी आजोबा दिसत नाही. त्यामुळे मुलांची भावनिक भूक भागविण्यासाठी हक्काची जागाच त्यांना उपलब्ध नाही. अशावेळी ही मुलं मित्र आणि मैत्रिणींमध्ये प्रेम शोधतात. त्यामुळेच बर्‍याच मुलांना गर्लफ्रेंड आणि बर्‍याच मुलींना बॉयफ्रेंड आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी आईवडिलांनीच मुलांना वेळ आणि प्रेम देणे जास्त गरजेचे आहे. शिक्षकांनीही मुलांच्या भावनिक गरजा ओळखल्या पाहिजे.

संस्कृतीचा अतिरेक:

सर्वेक्षणात बर्‍याच ठिकाणी विचारांमधील संकुचितता सामोरे आली. संस्कृतीच्या नावावर मुलांवर अनेक बंधने. मुलांनी मुलींशी बोललेले अनेकांना चालत नाही. सार्वजनिक ठिकाणीही ते मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. जाहीररीत्या ते एकमेकांना भेटूही शकत नाहीत. मग त्यांनी काय करावे? आपण त्यांचे निरागस नाते खुल्या मनाने का स्वीकारत नाही?

मुलं मुली जर खुलेआम सोबत फिरू शकत नसतील तर आईसक्रीम पार्लरमध्ये , बॉटनिकल गार्डनमध्ये किंवा इतर अलिप्त ठिकाणी जाण्याशिवाय त्यांच्याकडे काय पर्याय आहे? आपण संस्कृतीच्या नावावर मुलांवर अनेक बंधने लादतो. त्यांच्या वयानुसार, निसर्गत: त्यांना जर कुणाशी बोलावेसे वाटत असेल तर त्यात चुकीचे काय आहे?

प्रश्न हा नाही की मुले झाडेमागे, बागेत किंवा पार्लरमध्ये जे करतात ते चूक की बरोबर! पण त्यांच्यावर तसे करायची वेळ का येते, याचा विचार आपण कधीतरी करणार की नाही. काही राजकीय नेते त्यांना व्हॅलेन्टाईन्स डेदेखील साजरा करू देत नाही. लपण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच मार्ग राहत नाही.

बिझी लाईफ स्टाइल:

कोणी कामाने तर कोणी कामाशिवाय आजच्या काळात प्रत्येक जण बिझी आहे. आई टीव्ही मालिकांमध्ये बिझी तर वडिलांना ऑफिसमधून फुरसत मिळत नाही. मुलगा शाळेत गेला की आणखी कुठे फिरतो आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी बरेच जन रिकामे नाहीत. या परिस्थितीचा मुलं गैरफायदा घेत आहेत. त्यातल्या त्यात आज मोबाईल व सोशल नेट्वर्किंगचा वापर वाढवला आहे. मोबाईल वर कोणीही सहज खोटे बोलू शकतो. जेव्हा शाळेकडून पालकांना फोन केला जातो, तेव्हा अनेक पालकही फोन रिसीव्ह करत नाहीत. शाळेतील कर्मचारी एक-दोनदा ट्राय करून मग फोन करीत नाही. अशाने मुलांकडे दुर्लक्ष होते. पण केवळ पालक आणि शिक्षकांवर जबाबदारी देऊन चालणार नाही. सर्व समाजाने जबाबदारी ओळखली पाहिजे.

मुलांचा आदर्श हरवला:

निलेश गोरे सांगतात,  सर्वेक्षणात एका गोष्टीचा मोठा चटका लागला तो म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, पालक आणि इतर ज्ञानदाते यांच्या प्रभावाचा आणि मार्गदर्शनाचा आभाव स्पष्ट दिसून आला.

आज सहज मिळणारा पैसा, जीवनशैलीत आलेला बदल आणि मुलांचे फालतू लाड यामुळे मुले सामाजिक भान विसरत चालली आहे. बर्‍याच कारणांमुळे सामाजिक जीवन मूल्यभ्रष्ट होत असताना मुलांकडून काय अपेक्षा करावी? आज त्यांच्यापुढे आदर्शच नाहीत. पूर्वी सामाजिक जीवनात नीतीमूल्यांवर भर होता. आज प्रत्येक जण वैयक्तिक स्वार्थ साधण्यात रममाण झाला आहे. माझं घर, माझी गाडी, माझी नोकरी यातच सर्व व्यस्त आहेत. एकाच घरात प्रत्येकाची वेगळी खोली आहे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, आईवडील नोकरीला असल्यामुळे मुले काय करीत आहे, याचे भानच पालकांना नाही. टीव्ही, चित्रपट आणि इंटरनेटवरून सहज उपलब्ध होणार्या अश्लील साहित्यामुळे मुले वाममार्गाला लागत आहे. यावर उपाय म्हणजे मुलांवर चांगले संस्कार करणे हाच आहे. आयुष्यात आदर्श नसेल तर ध्येयही नसते, ध्येय नसलेला मनुष्य सतत चुका करतो आणि हरतो.

वेक अप सिद अँड टॉक विथ युवर कीड:

सर्वेक्षणात असे आढळले की बहुतांशी पालकांचा आणि मुलांचा वैचारिक संवाद व विचारविनिमय होत नाही तसेच भावनाही पूर्णपणे व्यक्त केल्या जात नाहीत. आई – वडिलांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तो दिवसभर काय करतो, कुठे जातो याची माहिती त्यांनी ठेवलीच पाहिजे. विशेषत: मुलगी असेल तर तिला सगळ्या गोष्टींची पालकांनी माहिती दिली पाहिजे. मित्रांची ओढ, प्रेम, शारीरिक संबंध अशा विषयांवर पालकांनी मुलांशी ओपनली चर्चा करण्याची गरज आहे. शारीरिक सुख हे क्षणिक असल्याचे, मुलांना समजावून सांगितले पाहिजे. या वयात चुका केल्या तर त्याचे दुष्परिणाम पुढे आयुष्यभर भोगावे लागतील, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे.

राजनेत्यांची भूमिका:

शेवटी अजून एक महत्वाची बाजू म्हणजे राजनेत्यांची भूमिका. सर्वेक्षणात राजनेत्यांच्या परिपक्व निर्णयांचा अभाव निदर्शनास आला. निलेश गोरे विश्लेषणात सांगतात कि राजनेते हे समाज परिवर्तन घडवू शकतात तसेच राजनेते हे नेतृत्वाचे आदर्श असतात, पण नेतृत्वाचा उद्देश हा भय किंवा भ्रम निर्माण करणे नसून तो विश्वास निर्माण करणे आहे व तो प्रेमाने आणि आपुलकीनेच प्राप्त होतो ; तिरस्काराने, दोषारोपणाने किंवा विरोधाने नव्हे.

इतिहास साक्ष आहे की कोणत्याही राजकीय आंदोलनांनी नाजूक विषय हाताळल्या जावू शकत नाही म्हणून संवेदनशील आणि नाजूक

विषयांवर राजनेत्यांनी स्टंटबाजी न करता तसेच भावनेच्या व प्रसिद्धीच्या आहारी न जाता सकारात्मक, परिपक्व व नियंत्रित भूमिका घेणे

गरजेचे आहे कारण सकारात्मक नेतृत्वाचा प्रभाव हाच सामाजपारीवर्तनासाठी अत्यावश्यक असतो.

वरील महत्वाच्या बाबी गैरवर्तन थांबू शकतात व त्यावर अंतर्मुख होऊन विचार करणे व योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. वेलनेस फाउंडेशन तर्फे आम्ही एकच आव्हान करतो की जो मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सदगुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक व तोच खरा शिक्षक. प्रेमाची निरागसता जपनारी व्यक्तीच खरी प्रेमी असते, तर नैतिक व अनैतिक यांमधील तारतम्य बाळगणारा तरुणच खरा तरुण असतो. धिंड काढून, फटके मारून, कायदे काढून गैरवर्तन बदलत नाहीत तर त्यासाठी मुल्यांकन आणि मूल्यशिक्षणच महत्त्वाचे आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
6 + 6

तुमचे विचार(2)

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment