मुंबई - आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाज, गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली असून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीचा फटका संघाच्या ज्येष्ठ खेळाडूंना बसला आहे. लिटल मास्टर सचिन तेंडुलकरची क्रमवारी खाली घसरून तो 28 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या दोन अर्धशतकांनी हात दिला असून त्याला दोन क्रमांकांनी बढती मिळून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेचे हशीम आमला पहिल्या तर ए. बी. डिव्हिलियर्स दुस-या क्रमांकावर आहेत. गोलंदाजांमध्ये पहिल्या दहामध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला स्थान मिळाले नाही. 11 व्या क्रमांकावर आर. अश्विन असून त्यानंतरचा भारतीय गोलंदाज रवींद्र जाडेजा 27 व्या क्रमांकावर आहे. जहीर खान 30 व्या, तर प्रवीणकुमार 36 व्या क्रमांकावर आहे. पाच अष्टपैलू खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाला स्थान मिळवता आले नाही.
पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेत बाजी मारून पाकिस्तानवर उलटवणारा इंग्लंडचा कप्तान कूक याने चक्क 27 क्रमांकावरून उंच उडी मारून आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांचा जोनाथन ट्रॉट सहाव्या क्रमांकावर आहे. अॅलिस्टर कूकने फलंदाजीच्या क्रमवारीत जशी झेप घेतली तशीच झेप गोलंदाजांच्या क्रमवारीत स्टीव्हन फिन याने घेतली आहे. 76 व्या क्रमांकावरून टॉप टेनमध्ये झेप घेणारा फिन नवव्या स्थानावर आहे.