जाहिरात
 
 
 

फ्लेचर आहे सर्वाधिक अकार्यक्षम व्यक्ती : इंजिनिअर

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 23:38(01/02/12)
 
 
 

चेन्नई - भारतीय क्रिकेट संघाच्या विदेशी मैदानावरील सुमार कामगिरीचे खापर संघाच्या वरिष्ठ खेळाडूंवर फोडले जात आहे. मात्र, या सर्व अपयशाला जबाबदार संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर आहेत. फ्लेचर सर्वाधिक फालतू व्यक्ती आहेत, अशी सणसणाटी टीका भारताचे माजी यष्टिरक्षक फारूक इंजिनिअर यांनी केली. 

टीम इंडियाच्या विदेशातील गचाळ कामगिरीमुळे फारूक इंजिनिअर चांगलेच निराश झाले आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या चुकांतून टीम इंडियाच्या खेळाडूंनी कोणताच बोध घेतला नाही. त्याच त्या चुका वारंवार होत गेल्या. याचा फटका संघाला बसला आणि भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 4-0 ने धुतले, असे त्यांचे म्हणणे आहे. 

‘मला भारतीय संघाकडून कोणत्याही चमत्कारिक प्रदर्शनाची आशा नव्हती. मात्र, आपले खेळाडू किमान संघर्ष तरी करतील, असा विश्वास होता. मात्र, भारतीय खेळाडू स्वत:चे नाक कापून आले. पीटर सिडल आणि बेन हिल्फेनहॉस हे काही वर्ल्डक्लास दर्जाचे गोलंदाज नाहीत. अशा गोलंदाजांसमोर भारताने गुडघे टेकवले,’ असे इंजिनिअर यांनी सांगितले. 

या वेळी त्यांनी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यावरही टीका केली. ‘फ्लेचर सर्वाधिक फालतू व्यक्ती आहेत. मी बीसीसीआयचा सदस्य किंवा अधिकारी असतो तर सर्वात आधी त्यांना संघाबाहेर काढले असते. फ्लेचर यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळावी, असे मला कधीच वाटले नाही. संघात बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही हे मला माहिती होते. फ्लेचर हे काही फार मोठे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व नाही. खेळाडूंना एखादा पैलूू समजून सांगण्याची कलासुद्धा त्यांच्याकडे नाही, ’ असेही या वेळी भारताच्या या माजी खेळाडूने म्हटले. 

तुम्ही फ्लेचर यांचा इतका विरोध का करीत आहात, असा प्रश्न फारूक इंजिनिअर यांना केला असता ते म्हणाले, ‘फ्लेचर यांच्याबाबतचे हे काही माझ्या एकट्याचे मत नाही. फ्लेचर यापूर्वी इंग्लंड संघाचेही प्रशिक्षक होते. मी त्या संघातील अनेक खेळाडूंशी चर्चा केली आहे. त्यापैकी एकानेही फ्लेचर यांची स्तुती केली नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.  

धोनीच्या यष्टिरक्षणात सुधारणा नाही - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सुमार यष्टिरक्षणामुळेही इंजिनिअर निराश दिसले. धोनीने यष्टिरक्षणात कोणतीच सुधारणा केलेली नाही. इंग्लंडमध्ये त्याची यष्टिरक्षक म्हणून कामगिरी सुमार दर्जाची  होती. ऑस्ट्रेलियातही यष्टीमागे त्याचे प्रदर्शन गचाळ होते, अशी टीकाही इंजिनिअर यांनी या वेळी केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment