Home » Sports » Latest News » Hard Work Essential For Success Says Kapil Dev

जो मेहनत घेईल, तोच पुढे जाईल : कपिलदेव

प्रतिनिधी | Jan 05, 2013, 00:35AM IST
जो मेहनत घेईल, तोच पुढे जाईल : कपिलदेव

औरंगाबाद- जो मेहनत घेईल, तोच पुढे जाईल. मेहनतीशिवाय यश मिळत नाही. यशासाठी कोणताच शॉर्टकट नाही. मेहनत करा, चांगले खेळत राहा आणि पुढे जा...युवा खेळाडूंना असा अनुभवसिद्ध सल्ला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सर्वकालीन महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिलदेव यांनी दिला. व्हेरॉक-एडीसीए कॉर्पोरेट टी-20 स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी औरंगाबादेत आले असता कपिलदेव बोलत होते. या वेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी खिलाडूवृत्तीने खेळ केला पाहिजे. पराभूत होणा-यांनी नाऊमेद न होता पुढच्या विजयासाठी प्रयत्न केले पाहिजे. एकच संघ नेहमी जिंकू शकत नाही हेसुद्धा सर्वांनी लक्षात घ्यावे, असे त्यांनी म्हटले.


यापूर्वी त्यांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथेही उपस्थितांशी मुक्तसंवाद साधला. ‘कालच्या मॅचबद्दल (भारत-पाकिस्तान दुसरा वनडे) मी काहीच बोलणार नाही. चांगले खेळतात, तेव्हा आपण सर्वच जण चांगले बोलतो. मी कोणाबद्दल वाईट बोलू शकत नाही. वाईट बोलू शकत नसाल तर त्यापेक्षा काहीच न बोललेले बरे, असे मला वाटते. पराभवाचे दु:ख झाले आहे, यात काहीच शंका नाही. विजय मिळाला असता तर त्यासारखा दुसरा आनंद नसतो,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘फाइव्ह पॉइंट्स’

1. राष्‍ट्रभाषेचा सन्मान करणे मला आवडते. हल्ली इंग्रजीचा बोलबोला आहे. माझे प्रेम राष्‍ट्रभाषेवर आहे. आता हिंदीतूनही समालोचन सुरू झाले. मी इंग्रजीपेक्षा हिंदीतच बोलण्यास प्राधान्य देतो.
2. क्रिकेटच काय, कोणत्याही खेळाच्या विकासासाठी प्रायोजक पुढे येणे गरजेचे आहे. सक्षम प्रायोजकांनी पुढे येत सर्व खेळांना मदत करावी.
3. आमच्यावेळी क्रिकेट एवढे लोकप्रिय नव्हते. त्या वेळी पालक मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न बघायचे. आता पालक मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न पाहू लागले.
4. छोट्या शहरातूनही चांगले खेळाडू पुढे येत आहेत. चांगली गुणवत्ता पुढे आणण्याचे चॅलेंज आता छोट्या शहरांसमोर आहे.
5. खेळ कोणताही असो, मेहनतीशिवाय यश मिळत नाही. यशासाठी शॉर्टकट नसतो. तरुणांनी मोठे यश मिळेपर्यंत अखंड प्रयत्न केले पाहिजे.

Email Print
0
Comment