नवी दिल्ली - स्टार खेळाडू संदीपसिंगने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक पात्रता फेरीत बुधवारी कॅनडावर 3-2 ने विजय मिळवला. भारताचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. दुसरीकडे भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेकडून 5-2 ने पराभवाचा सामना करावा लागला.
भारताकडून संदीपसिंगने पेनॉल्टी कॉर्नरवर 40 व्या आणि 61 व्या मिनिटाला दोन गोल केले. शिवेंद्रसिंगने सामन्याच्या 26 व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला होता. कॅनडाकडून मार्क पीअरसनने 50 व्या आणि स्कॉट टुपरने 53 व्या मिनिटाला गोल केले. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि कॅनडाला पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या दोन गोलसह संदीपसिंगचे स्पर्धेत 9 गोल झाले आहेत. भारतीय पुरुष संघाने स्पर्धेतील चारही सामन्यात विजय मिळवला. भारताने आतापर्यंत अनुक्रमे सिंगापूर, इटली, फ्रान्स आणि कॅनडा संघांला पराभूत केले. आता शुक्रवारी भारतीय पुरुष संघाला आपल्या गटात पोलंडचे आव्हान असेल.
दक्षिण आफ्रिका संघाने
आज झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय महिलांपेक्षा सरस खेळ केला. आफ्रिकन खेळाडूंचा ताळमेळ, पासिंग अतिशय शानदार होते. आफ्रिकेच्या डिफेंडर्सनी जबरदस्त खेळ करून भारतीय महिलांना फारशी संधीच दिली नाही. आफ्रिकेचा हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय ठरला.
आफ्रिकेकडून डिरर्की चेम्बरलेन हिने सर्वाधिक तीन गोल केले. सुलेती डॅमोन्सने दोन गोल केले. डिरकीने सामन्याच्या 12 व्या, 32 व्या आणि 58 व्या मिनिटाला गोल केले. तर सुलेतीने 53 व्या आणि 67 व्या मिनिटाला गोल करून भारतीय सुरक्षा फळीतील उणिवा स्पष्ट केल्या.
भारताकडून कर्णधार असुंता लाकराने 23 व्या तर सौंदर्या येंदेला हिने 52 व्या मिनिटाला गोल करून जोरदार प्रयत्न केले. मात्र, या खेळाडूंचे प्रयत्न भारताचा पराभव टाळू शकले नाहीत.
आफ्रिकेने भारताच्या तुलनेत अतिशय वेगवान आणि आक्रमक खेळ केला. त्यांनी भारताच्या परिघातच अधिक वेळ चेंडू ठेवण्यात यश मिळविले. भारतीय महिला खेळाडूंची पासिंग चांगली झाली नाही. खेळाडूंत योग्य समन्वय आणि ताळमेळही दिसला नाही. याचा फटका संघाला बसला. भारताने वारंवार गोल करण्याच्या संधी गमावल्या.