ब्रिसबेन - मंगळवारी श्रीलंकेच्या ‘वाघां’समोर भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या एकट्या वीरेंद्र सेह‘वाग’चे तगडे आव्हान असणार आहे. धोनीच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार वीरेंद्र सेहवाग प्रयत्नशील राहणार आहे, तर भारताला नमवून दुस-या स्थानावर बाजी मारण्यासाठी श्रीलंका सज्ज झाली आहे. गुणतालिकेत 10 गुणासह भारत दुस-या, तर श्रीलंका 7 गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे.
तिरंगी मालिकेतील आठवा सामना मंगळवारी भारत-श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दोघांनाही विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होणार आहे. सलगच्या दोन पराभवानंतर दमदार पुनरागमन करणा-या श्रीलंकेचे अव्वल फलंदाज व गोलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात याचाच प्रत्यय श्रीलंकेने शुक्रवारच्या सामन्यात आणून दिला. तसेच अव्वल दोनमध्येही स्थान मिळवण्याचा श्रीलंका संघाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भारताला श्रीलंकेच्या आव्हानाला मोडीत काढण्यासाठी चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. त्यासाठी झहीर खान, विनयकुमार या जोडीला घातक गोलंदाजीचे प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे.तसेच सध्या फार्मात असलेल्या गौतम गंभीरवरही फलंदाजीची मदार असणार आहे.
सचिनला विश्रांती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ब्रेट लीचा वेगवान चेंडू लागल्याने सचिन तेंडुलकरचा डोळा सुजला आहे. त्यामुळे सोमवारी त्याचे एमआयआर काढण्यात आले. ही दुखापत अधिकच गंभीर असल्यामुळे मंगळवारी होत असलेल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला जाऊ शकतो. संभाव्य संघात सचिनचे नाव आहे. चेंडूचा फटका बसल्याने सचिनच्या डोळ्याला मोठी सूज आलेली आहे.त्यामुळे महाशतक पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे दिसते.
अश्विनला संधी - श्रीलंकेविरुद्धच्या मागील दोन सामन्यांत बहारदार कामगिरी करत शानदार पाच विकेट भारताच्या आर. अश्विनने काढल्या आहेत. त्यामुळे मंगळवारीही लंकेविरुद्धच्या सामन्यात घातक गोलंदाजीचे प्रदर्शन करणा-या अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
उमेश होणार बाहेर - येथील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारत तीन वेगवान गोलंदाजांचा वापर करण्याची शक्यता आहे. यामुळे उमेश यादवला बाहेर बसावे लागणार आहे. जहीर खान, विनयकुमार, इरफान पठाण या त्रिकुटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
संभाव्य संघ - भारत-वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, पार्थिव पटेल, रवींद्र जडेजा, इरफान पठाण, आर.अश्विन, जहीर खान, विनयकुमार, प्रवीणकुमार, उमेश यादव.
श्रीलंका-महेला जयवर्धने (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, दिनेश चांदीमल,मॅथ्यूज, थिरीमान, टी.परेरा, महारूफ, कुलाशेखरा, मलिंगा, हेरार्थ.
सलामीला सेहवाग, गंभीर - सचिनला विश्रांती देण्याच्या निर्णय घेतल्यास कर्णधाराच्या भूमिकेत मैदानावर उतरणारा वीरेंद्र सेहवाग हा गौतम गंभीरसोबत सलामीची फलंदाजी करण्याची शक्यता आहे. रोटेशन पद्धतीचा अवलंब केल्यास विश्रांती देण्याचा क्रम सचिनचा आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग-गौतम ही जोडी सलामीला येऊ शकते.