Home » Sports » Cricket » Latest News » Maharashtra Defeat Gujarat In Western Divisional One Day Match

पश्चिम विभागीय वनडे स्पर्धेत महाराष्‍ट्राचा गुजरातवर विजय

क्रीडा प्रतिनिधी | Feb 14, 2013, 23:47PM IST
पश्चिम विभागीय वनडे स्पर्धेत महाराष्‍ट्राचा गुजरातवर विजय

पुणे - बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय वनडे स्पर्धेत महाराष्‍ट्राने गुजरातवर 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह संघाचे 4 गुण झाले आहेत. महाराष्ट्राच्या विजयात विजय झोलने (69), रोहित मोटवाणीने (53) आणि केदार जाधवने (64) शानदार अर्धशतके ठोकली.

पूना क्लब मैदानावर झालेल्या लढतीत नाणेफेक जिंकून महाराष्‍ट्राने गुजरातला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. गुजरातने 50 षटकांत 7 बाद 289 धावा काढल्या. प्रत्युत्तरात महाराष्‍ट्रा ने 49.1 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर हर्षद खडीवाले 20 धावा काढून तंबूत परतला. विजय झोलने 80 चेंडूंत 69 धावा केल्या. ईश्वर चौधरीने त्याला कैलास भाकूवच्या हाती झेलबाद केले. रोहित मोटवाणीने 57 चेंडूंत अर्धशतक झळकावले. केदार जाधवने 49 चेंडूंचा सामना करताना शानदार 64 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. पटेलच्या गोलंदाजीवर राकेश ध्रुवने त्याचा झेल टिपला. अंकित बावणे मोठी खेळी करू शकला नाही. तो 7 धावा काढून बाद झाला. पराग भाटीने 35 धावांचे योगदान दिले. श्रीकांत मुंढेने नाबाद 19 धावा काढत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, गुजरातचा सलामीवीर मनप्रीत जुनेजाने 124 चेंडूंत झळकावलेले नाबाद शतक (114) व्यर्थ गेले. चिराग गांधी (20), अक्षर पटेल (45) आणि राकेश धु्रवच्या 24 धावा वगळता इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. महाराष्‍ट्राकडून समद फल्लाह, श्रीकांत मुंढे व अक्षय दरेकर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

विजय, श्रीकांत चमकले
विजय झोल आणि श्रीकांत मुंढेने शानदार कामगिरीने आजचा दिवस गाजवला. श्रीकांत मुंढेने धारदार गोलंदाजी करत 10 षटकांत 53 धावा देत 2 बळी घेतले. त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करत 9 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत 19 धावांची उपयुक्त खेळी केली. विजय झोलने 80 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 69 धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
विजय-रोहितची शतकी भागीदारी
विजय झोल (69) आणि रोहित मोटवाणीने (53) संयमी खेळी करत शतकी भागीदारी रचली. त्यांनी 133 चेंडूंचा सामना करत 123 धावा काढल्या.


भविष्य उज्ज्वल : देशमुख
विजय झोलने महाराष्‍ट्रा च्या वरिष्ठ संघातर्फे खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने शानदार अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. कामगिरीमध्ये अशा प्रकारे सातत्य राखले तर त्याचे भविष्य उज्ज्वल आहे.
अ‍ॅड. प्रदीप देशमुख, विभागीय सचिव, एमसीए.

Email Print
0
Comment