सिडनी - वन डे क्रिकेटमधील करीअर संपल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने मान्य केले आहे. अर्थात हे मान्य करतानाच त्याने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून एक प्रकारे निवृत्तीच घेतली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्याने निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले नाही. परंतु, आपले करीअर संपले असल्याचे त्याने निराश मनाने बोलून दाखविले.
ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार राहीलेल्या रिकी पॉंटिंगला वन डे संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याचे वन डे क्रिकेटमधील करीअर संपल्याचे बोलले जात होते. आज त्याने खुद्द हे मान्य केले. आपण कसोटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचे पॉंटिंगने स्पष्ट केले. सिडनीमध्ये पत्रकारांसोबत बोलताना तो म्हणाला, मी कसोटी सामने खेळणार आहे. तसेच टास्मानियासाठीही मी खेळत राहणार आहे. कसोटी सामन्यांमध्ये मी अजूनही चांगला खेळू शकतो, हे मी सिद्ध केले आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या भविष्यातील संघाच्या योजनेत मी बसत नाही. हे निवड समितीचे अध्यक्ष जॉन इन्हेरॅरीटी यांनी मला सांगितले. या निश्चितच मला वाईट वाटले. मी यापुढे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, निवड समितीबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची कटूता नाही. निवड समितीला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघ घडवायचा आहे. त्यामुळे मी त्यांचा उद्देश समजू शकतो, असे पॉंटिंग म्हणाला.