नवी दिल्ली- टीम इंडियामध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यातील मतभेद कमी होताना दिसत नाही. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यासाठी दोघांनी वेगवेगळे संघ निवडले होते. परंतु, शेवटी सेहवागने आपलाच संघ मैदानात उतरवला होता.
माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेद सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटूंनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाच्या पराभवास खेळाडूंमधील मतभेदच कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. धोनीला संघात रोहित शर्मा हवा होता तर सेहवागला सचिन, गंभीर यांना संघात घ्यायचे होते. शेवटी सेहवागने आपलाच संघ निवडला. काही दिवसांपूर्वीच धोनीने संघातील वरिष्ठ खेळाडूंना सुस्त म्हटले होते.
माध्यमांमध्ये सातत्याने होत असलेल्या खेळाडूंमधील मतभेदाच्या चर्चेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंनी आपला वाद ड्रेसिंग रूममध्येच मिटवण्यास सांगितले आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार सेहवाग वेगळयाच अंदाजात दिसला होता. त्याने स्वत: घेतलेल्या कॅचबद्दल पत्रकारांना विचारले आणि गेल्या 10 वर्षांपासून आम्ही असेच क्षेत्ररक्षण करतो, असा टोलाही धोनीचे नाव न घेता मारला.
आपले मत
टीम इंडियातील खेळाडूंच्या मतभेदास कोण जबाबदार आहे? याचा संघावर काय परिणाम होईल? आपण आपले मत खालील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आक्षेपार्ह मतास वाचक स्वत: जबाबदार असतील.