दुबई- एकीकडे टीम इंडियाचे प्रदर्शन घसरले आहे तर दुसरीकडे कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीतील स्थान चांगलेच सुधारले आहे. त्याने सलग दोन सामन्यात नाबाद खेळी करून आयसीसी क्रमवारीत पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले.
आयसीसीने घोषित केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये सेहवाग 14 व्या क्रमांकावरून घसरून 18 व्या स्थानी आला आहे. कर्णधार धोनीने दोन स्थानांची प्रगती करून चौथ्या स्थानी उडी घेतली आहे.
कॉमनवेल्थ बँक मालिकेत सेहवाग पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमधून फक्त 30 धावा केल्या तर धोनीने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करताना पाच एकदिवसीय सामन्यात 63.66 च्या सरासरीने 191 धावा ठोकल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.
युवा फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला आहे. दक्षिण अफ्रिकेचा हाशिम अमला आणि अॅबी डिविलियर्स हे क्रमश: पहिल्या व दुस-या स्थानी आहेत.
टॉप 20 मध्ये अश्विन एकमेव भारतीय गोलंदाज
आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 20 जणांमध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विन हा एकमेव भारतीय आहे. त्याने क्रमवारीत तीन स्थांनाची सुधारणा करून 11 व्या स्थानी झेप घेतली आहे.