लंडन - चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सीएसकेए मॉस्को आणि रिअल माद्रिद संघादरम्यानचा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. दुसरीकडे नापोली संघाने चेल्सावर 3-1 ने मात करून शानदार विजय मिळवला.
मॉस्को आणि रिअल माद्रिदची लढत प्रेक्षणीय होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोचा खेळ पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियमवर गर्दी केली. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना रोनाल्डाने सामन्याच्या 28 व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. त्याच्या गोलमुळे रिअल माद्रिद संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर रिअल माद्रिदला आघाडी वाढवता आली नाही. दुसरीकडे मॉस्को संघानेही आपली सुरक्षा फळी मजबूत करण्यावर जोर दिला. सामना संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना मॉस्कोने गोल करून लढत बरोबरीत सोडवली. सामन्याच्या 93 व्या मिनिटाला अतिरिक्त वेळेत मॉस्को संघाचा खेळाडू वर्नेब्लुम याने संघासाठी बरोबरीचा गोल केला. रिअल माद्रिदचा हातात आलेला विजय निसटला.
दुस-या सामन्यात नापोली संघाने चेल्साला एकतर्फी लढतीत हरवले. चेल्साचा खेळाडू माटाने सामन्याच्या 27 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. अवघ्या काही मिनिटांनंतर नापोलीकडून लावेझीने 38 व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. यानंतर नापोली संघाने सामन्यावर आपली पकड मिळवली. 45 व्या मिनिटाला कॅवनीने गोल करून नापोलीची आघाडी 2-1 अशी केली. लावेझीने सामन्याच्या 65 व्या मिनिटाला आणखी एक गोल करून संघाची आघाडी 3-1 अशी केली. चेल्साला ही आघाडी अखेरपर्यंत कमी करता आली नाही. नापोलीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून चेल्सावर दडपण आणले.