Home » Mukt Vyaspith » Happiness In Defeating

पराभवातही विजयाचा आनंद

अजित दत्तूसिंह ठाकूर, औरंगाबाद | Feb 16, 2013, 02:00AM IST
पराभवातही विजयाचा आनंद


मी सातव्या इयत्तेत शिकत होतो, तेव्हाची गोष्ट आहे. मला लहानपणापासूनच वक्तृत्वाची अत्यंत आवड होती. शाळेतील प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला आणि स्पर्धा गाजवलीसुद्धा होती. एकदा प्रजासत्ताकदिनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5 वी ते 7 वी या गटासाठी ‘स्वच्छतेचे महत्त्व’ असा विषय होता. माझी धाकटी बहीण पूजा हिनेही या स्पर्धेत सहभाग नोंदवला. ती पाचव्या इयत्तेत होती. तिने माझ्याकडून भाषण लिहून मागितले. मी माझ्या भाषणाची तयारी केलेली होती. ती माझी स्पर्धक असल्याने माझ्या दृष्टीने अत्यंत कमी महत्त्वाचे मुद्दे आणि इतर शिल्लक मुद्दे तिला दिले. तिने वडिलांच्या साह्याने त्या मुद्द्याच्या आधारावर भाषण तयार केले. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि माझे भाषण आधी झाले. त्यानंतर तिचा क्रमांक आला.

तिने भाषणास अशी काही सुरुवात केली की, माझ्यासह आमच्या शाळेतील शिक्षक, स्पर्धेचे परीक्षक आणि विद्यार्थी अवाक् झाले. तिच्या संपूर्ण भाषणाचा प्रभाव पडला. मला तर खूप आश्चर्य वाटले, कारण माझ्याच भाषणातील कमी महत्त्वाचे मुद्दे तिला दिलेले होते. मला तोंडात बोटे घालण्याचीच पाळी आली. अपेक्षेप्रमाणे तिचाच पहिला क्रमांक आला, हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. स्पर्धेत बाजी मारण्याची आतापर्यंत माझीच मक्तेदारी होती. ती तिने संपुष्टात आणली. माझा पराभव जरी झालेला असला तरी त्याचे शल्य वाटण्याऐवजी मला आनंदच वाटला. छोट्या बहिणीकडून हार मानण्यात आलेल्या आनंदाची अनुभूती
तेव्हा मला उमजली.

Email Print
0
Comment