Home » Mukt Vyaspith » Police Show Power

पोलिसाने दाखवला हिसका

मनाजी घोरपडे, वैजापूर, जि. औरंगाबाद | Feb 20, 2013, 02:00AM IST
पोलिसाने दाखवला हिसका


पोलिस खात्याबद्दल ग्रामीण भागात म्हण आहे, येथे ‘वल्लंबी जळतं आणि सुक्कबी.’ कोणाशी खेटावं पण पोलिसांशी पंगा नको रे बाबा! माझ्या मित्राबाबतीत नेमका असाच अनुभव मलाही आला. त्याचे असे झाले. माझा एक मित्र एलआयसी एजंट होता. (आता त्यांना ‘विमा सल्लागार’ म्हणतात) त्याने एका भाजीविक्रेत्या महिलेची पॉलिसी काढलेली होती. त्याला चार-पाच वर्षे उलटून गेली. हा तिला विसरूनही गेला असावा. अचानक एके दिवशी दुपारच्या सुमारास ती त्याच्या घरी हजर झाली. त्याने विचारले, ‘कोण आपण? काय काम आहे?’ ती तडकली :अस्सं व्हय! माजी पॉलिसी काढली होती, त्याचे पैसे कुठंय? मला ते परत आणून दे! सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तो म्हणाला, ताई! तुम्ही पॉलिसीचे हप्तेच भरले नाहीत.

ती पॉलिसी तर लॅप्स म्हणजे बंद झाली. आता तिचे पैसे कसे मिळतील? मी तुम्हाला पॉलिसी काढताना सर्व कल्पना दिली होती. तुम्ही मान्यही केले होते, पण पैसे भरलेच नाहीत. मी चकरा मारल्या पण पैसे मला दिलेच नाहीत. मग भरणार कसे? ती तणतणत निघाली अन् पोलिस ठाणे गाठले. पोलिस सायंकाळी दारात हजर. ‘या बाईची तक्रार आहे. तुम्ही पैसे हडपले. साहेबांनी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. नाही आलात तर अटक करावी लागेल’, हवालदार दम भरून निघून गेला. मित्राची गाळण उडाली. तो माझ्याकडे आला. आम्ही पोलिस ठाणे गाठले. संबंधित ठाणे अंमलदारांशी बोललो. त्यानेही ताठ्यातच सांगितले. पैसे द्या, अन्यथा कोठडीत ठेवतो. संध्याकाळचे सहा वाजले, पोलिसाने खाक्या दाखवला. ‘ए! ऊठ साहेब यायची वेळ झाली. तुला अटक करण्यात आली आहे. सोमवारी कोर्टात बघू.’ आम्ही भानावर आलो. गयावया केल्या. साहेब, काय घ्यायचे घ्या, पण मिटवून टाका. तसा तो हळूच इकडे तिकडे बघत म्हणाला, त्या बाईचे होतात 700 आणि आमचे 500 असे बाराशे द्या. मामला खतम. आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. बाराशे रुपये टेकवून मान सोडवून घेतली.

Email Print
0
Comment