Home » Mukt Vyaspith » Sankrant Avoid Sankrant

संक्रांतीलाच टळली ‘संक्रांत’

प्रा. संदीप कडू माळी, जामनेर | Jan 19, 2013, 02:00AM IST
संक्रांतीलाच टळली ‘संक्रांत’


माझी पत्नी भारतीचे सीझर जामनेरच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये 12 जानेवारी 2012 ला झाले. सुदैवाने एका गोंडस बाळाने जन्म घेतला. गार्गी असे तिचे नाव ठेवण्यात आले. ऑपरेशन सुखरूप पार पडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. भारतीलाही फारसा त्रास होत नव्हता. आम्ही सर्व कुटुंबीय खुश होतो. मुलगी जन्माला यावी म्हणून आमच्या कुटुंबाने पाच पिढ्यांपर्यंत वाट पाहिली होती. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. दरम्यान, डॉक्टरसाहेबांनी ऑपरेशननंतर 5 ते ६ तासांनी व्हिजिट दिल्यावर भारतीच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली. तिचे रक्त तपासणीसाठी पाठवले. रात्री 10 पासून ते 13 तारखेला संध्याकाळी ६ पर्यंत तिचे रक्त सतत कमी कमी होत होते. त्यांनी पेशंटला जळगावला हलवण्याचा सल्ला दिला. तिच्या जिवाला धोका आहे, हे एव्हाना आम्हाला कळून चुकले होते.

तिच्यावरील अवघड शस्त्रक्रिया रात्री 2.30 वाजता पार पडली. सकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून सहयोग क्रिटिकल केअरमध्ये हलवण्यात आले. तिथेही विविध हमीपत्रे आमच्याकडून भरून घेण्यात आली. तो दिवस मकर संक्रांतीचा होता. माझ्या करारी वडिलांना लहान मुलासारखे रडताना मी प्रथमच पाहत होतो. आई आणि सासू-सासरे सुन्न बसले होते. संक्रांतीच्या गोड सणाच्या दिवशी देवाने आम्हाला कटू घास भरवला होता. दिवसभर तिच्या तब्येतीत सुधारणा नव्हती. सर्वांचा देवाचा धावा चालूच होता. नवस बोलले जात होते. रात्री उशिरा डॉक्टरांनी एको टेस्ट (ECO TEST) केल्यानंतर धोका काही प्रमाणात टळल्याचे सांगितले. तेव्हा आम्हाला हायसे वाटले. त्यानंतर तिच्या तब्येतीत दिवसागणिक सुधारणा दिसू लागली. ६ दिवस मृत्यूशी लढत देऊन भारती सुखरूप परत आली. माझ्या बाळाची आई आणि आमच्या घराचे हसू परत आले.

Email Print
0
Comment